संयुक्त राष्ट्रसंघात नुसती भाषणे देऊन काहीही साध्य होणार नाही, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काल संयुक्त राष्ट्र आमसभेत केलेल्या भाषणानंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रसंघात नुसती भाषणे देऊन काहीही होणार नाही. आपण भाषणांमध्ये पाकिस्तानचे साधे नावही उच्चारत नाही. नवाज शरीफ जाहीरपणे भारताचा उल्लेख करत असताना आपण असे का करत आहोत, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांच्या या प्रतिक्रियेला लवकरच भाजपकडून प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेने कालच ‘सामना’मधून गेल्या दोन वर्षांपासून परदेश दौरे करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली दुनियादारी निरर्थक ठरल्याची टीका केली होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरु आहेत, पण पाकिस्तानला मिळणारी मदत पाहता एकटे कोण पडले असा खोचक सवाल शिवसेनेने उपस्थित केला होता. इस्लामी राष्ट्र संघटनेनेने काश्मीरप्रश्नी पाकला पाठिंबा दिला, मग मोदींनी अरब राष्ट्रात जाऊन जी दुनियादारी केली त्याचा उपयोग काय असा सवालही शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. १९७१ च्या बांगलादेश युद्धात रशियाने इंदिरा गांधीच्या मदतीला म्हणजे भारतासाठी सातवे आरमार पाठवून मैत्री निभावली होती, तशी मैत्री निभावताना आज कोण दिसत नाही असा चिमटाही अग्रलेखातून काढण्यात आला होता. पाकिस्तानच्या मुद्द्यावरून शिवसेनेकडून वारंवार डिवचले जात असल्याने आगामी काळात दोन्ही पक्षांतील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघात जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठणकावून सांगितले. ‘काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारायचे नसतात,’ या त्यांच्या वाक्याने सभागृहातही टाळ्यांचा कडकडाट झाला. सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत सोमवारी दुसऱ्यांदा संबोधित करत होत्या. यापुर्वी त्यांनी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी संयुक्त राष्ट्रसंघातील सदस्यांना संबोधित केले होते. विशेष म्हणजे त्यांनी  भाषण हिंदीमध्ये केले. त्यामुळे पाकिस्तानला संदेश पोहचविण्यासाठी सुषमा यांनी हिंदीमध्ये भाषण केल्याची चर्चा रंगली होती.