काँग्रेससाठी सध्या आव्हानात्मक कालखंड आहे. अशा वेळी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा अशोक चव्हाण यांच्यावर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसशी समन्वय ठेवून या वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सामोरे जाण्याचे आव्हान आहे. तरुण तसेच शहरी भागात पक्षाला पुन्हा स्थान मिळवून देण्यात ते कसे यशस्वी ठरतात हे महत्त्वाचे आहे.अशा मुद्दय़ावर त्यांनी केलेली बातचीत.
प्रदेशाध्यक्षपदी निवड झल्यावर प्राधान्य कशाला देणार ?
चव्हाण – महाराष्ट्रात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यावर भर देणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये पक्षसंघटना फारच कमकुवत आहे. त्या जिल्ह्यांमध्ये लक्ष घालावे लागेल. राज्याच्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहे.
नारायण राणे नाराज झाले आहेत, त्याबाबत ?
चव्हाण – राणे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी आपण जरूर चर्चा करू. मागे नाराज झाले तेव्हा त्यांना पक्षात परत आणण्यासाठी आपणच पुढाकार घेतला होता.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर राज्यात काँग्रेस फारच कमकुवत झाला आहे. विरोधी पक्षाची भूमिका बजाविण्यातही पक्ष अयशस्वी ठरला आहे. परिस्थिती कशी बदलणार ?
चव्हाण – पराभवामुळे पक्षसंघटनेत शैथिल्य आले ही वस्तुस्थिती आहे. पण लोकांचे प्रश्न हाती घेऊन आम्ही आता उतरणार आहोत. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल. दुष्काळ, अवेळी पाऊस, कायदा आणि सुव्यवस्था या प्रमुख प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली जाईल.
* राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संबंध कसे राहतील ?
चव्हाण – विरोधी पक्षाची भूमिका बजाविताना समविचारी पक्षांना बरोबर घेऊ. मग राष्ट्रवादीही त्याला अपवाद नसेल. राष्ट्रवादीने विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला असला तरी त्यातून काही तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मुख्यमंत्रीपदी असताना राष्ट्रवादीबरोबर असलेल्या संबंधाचा फायदा होईल.
* ‘आदर्श’ किंवा ‘पेडन्यूज’मुळे आपल्या प्रतिमेवर परिणाम झाला. मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यावर हे मुद्दे पुन्हा समोर येतील किंवा विरोधक त्यावर भर देतील असे वाटत नाही का ?
चव्हाण – ‘पेडन्यूज’चे प्रकरण निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे निकालात निघाले आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे. ‘आदर्श’ प्रकरणावरून बरीच ओरड करण्यात आली व आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. पण गेल्या साडेचार वर्षांंमध्ये जी वस्तुस्थिती समोर आली त्यावरून हाती काहीच लागलेले नाही. लोकसभा निवडणुकीत पक्षाने मला उमेदवारी देण्यात दिली तेव्हाच पक्षाने सारा विचार केला होता. तेव्हा पक्षाने आपल्याला क्लिनचिट दिली होती. प्रकरण न्यायप्रवीष्ठ असल्याने अधिक न बोलणे बरे.