मध्य व पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना पास काढण्यासाठी वास्तव्याचा दाखला सादर करण्याची नवीन टूम काढण्यात आली आहे. त्यात आता अर्जाची भर पडणार आहे. अर्जाचे स्वरूप कसे असावे यासंदर्भात सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे एका बडय़ा अधिकाऱ्याने सांगितले.
पश्चिम रेल्वेवर पास काढण्यासाठी वास्तव्याचा दाखला अनिवार्य केल्यानंतर आता मध्य रेल्वेवरही या नियमाची अमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, भल्या मोठय़ा रांगेत उभे राहून पास काढतेवेळी तिकीट खिडकीवरील कर्मचाऱ्याला पत्ता सांगणे खूपच जिकिरीचे होते. आजूबाजूच्या आवाजामुळे अनेकदा बुकिंग क्लार्कला पत्ता नीट ऐकू येत नाही आणि मागची रांग खोळंबते. त्यामुळे हे कर्मचारी प्रवाशांना त्यांचा पत्ता एका कागदावर लिहून देण्यास सांगतात. असे अनुभव आल्यामुळे या समस्येवर तोडगा म्हणून मध्य रेल्वे एक अर्ज तयार करण्याच्या विचारात असल्याची माहिती एका बडय़ा अधिकाऱ्याने दिली.
सध्या रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या आरक्षणासाठी प्रवाशांना अर्ज भरावा लागतो. या अर्जात प्रवाशांची नावे, पत्ता, दूरध्वनी क्रमांक ही माहिती भरावी लागते. अशाच प्रकारचा अर्ज आता मासिक व त्रमासिक पाससाठी लागू करण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करत आहे. या अर्जाचे स्वरूप कसे असावे,
याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. या अर्जाचे स्वरूप रेल्वे मुख्यालयाकडे पाठवले जाणार असून तेथून ते देशभर लागू होणार असल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.