उद्या जर सर्वसामान्यांसाठी माझ्या घरासमोरून उड्डाणपूल जाणार असेल, तर मी त्याला खुशाल मान्यता देईन. – नाना पाटेकर
आता प्रामाणिक असण्यासाठी पारितोषिके दिली जातात. कुणीही उठतो, ट्रस्ट काढतो, जीवनगौरव जाहीर करतो आणि देशातील भारतरत्नही हे पुरस्कार स्वीकारतात, असे उपहासगर्भ टीकाप्रहार करतानाच, एकत्र कुटुंब पद्धत आणि शेजारधर्म नाहीसा झाल्याने एकमेकांच्या सुख-दु:खाशी निगडित असणारे आता विलग झाले आहेत आणि त्यामुळेच सामाजिक गुन्हेगारी फोफावली आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी ठाणे येथे व्यक्त केले. आपल्या भाषणातून प्रचलित व्यवस्थेबद्दलची चीड व्यक्त करणाऱ्या नानांनी, टाळ्या वाजविणारे हात कधी उचलायचे, हे आता शिका, असा सल्लाही दिला.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘लढा बदलत्या सामाजिक गुन्ह्य़ांशी’ या विषयावर डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात ते बोलत होते. संगणकात डोकावण्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात डोकावण्याची वृत्ती चांगली असून यामुळेच आमच्या जाणिवा रुंदावल्या, सजग झाल्या. आता चाळी उंच झाल्या असल्या तरी तिथे एकोपा आणि नाती उरली नाहीत, असे सांगून ते म्हणाले, की पोलीस थोरला भाऊ म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्या झटकून चालणार नाही. खाकी वर्दीतलापण माणूसच आहे. ते पैसे खातात, हे बोलणे अगदी सोपे आहे, पण त्यांची घरे बघा, खुराडे तरी बरे, अशी अवस्था आहे. नवी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचे आणि संरक्षण देणाऱ्या पोलिसांचे पगार कमी आहेत, या विरोधाभासाकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले.
कुणी तरी ट्रस्ट काढतो, त्यामध्ये पैसा कुठून येतो, माहीत नाही! त्यामुळे अशा ट्रस्टच्याही चौकशी करायला हव्यात, असेही त्यांनी सडेतोडपणे सांगितले.
सोशल नेटवर्किंग साइटचा वापर आणि त्यामुळे अपहरण, चोरी, आत्महत्या, घटस्फोटचे गुन्हे कसे घडतात, याविषयी सायबर तज्ज्ञ, अ‍ॅड. प्रशांत माळी यांनी सोदाहरण माहिती दिली. सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून तुमची माहिती संकलित होत असून त्याचा उपयोग कसा होत आहे, याचा विचार करायला हवा, कारण यापुढे गुन्हेगारीचे स्वरूप आर्थिक असणार आहे, त्यासाठी सुरक्षा व्यवस्थेचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. तसेच आर्थिक आणि सामाजिक बदल, याचे भान आपल्याला असायला हवे, असे सांगत त्यांनी सामाजिक गुन्हेगारीचा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध सोदाहरण स्पष्ट केला. तुमच्या सहयोगाशिवाय तुमची सुरक्षितता करणे अशक्य आहे, त्यामुळे तुमचे सहकार्य हवे आहे, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांनी या कार्यक्रमात बोलताना केले.