जागावाटपाच्या मुद्यावरून महायुतीत आठवडाभर खेळ सुरूच असताना आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडीचे नाटय़ सुरू झाले आहे. राष्ट्रवादीला १२४ जागांचा प्रस्ताव दिल्यानंतरही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आघाडीचे भवितव्य अधांतरी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी नवी दिल्लीत सांगितले. तर १२४ पेक्षा जास्त जागांची मागणी करत राष्ट्रवादीने काँग्रेसला सोमवापर्यंतची मुदत दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र, सत्ताधारी आघाडीचे घोडे जागावाटपावरच अडले आहे. प्रदेश पातळीवर दोन्ही पक्षांतील चर्चा निष्फळ झाल्याने जागावाटपाचा मुद्दा शनिवारी नवी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर मांडण्यात आला. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या, या मुद्यावर चर्चा झाली. तसेच काँग्रेसने दावा केलेल्या जागांच्या उमेदवारीबाबतही चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला १२४ जागांचा प्रस्ताव दिल्याचे माणिकराव ठाकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी सायंकाळी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचा १२४ जागांचा प्रस्ताव फेटाळून लावला. ‘निम्म्या जागांची (१४४) आमची मागणी अद्याप कायम आहे. आम्हाला जागा वाढवून हव्या आहेत. काँग्रेसने सोमवारी सकाळपर्यंत निर्णय कळवावा, अन्यथा आम्हाला  अन्य पर्याय खुले आहेत,’ असा इशारा पटेल यांनी दिला.  १२४ ते १४४ यामध्ये राष्ट्रवादी किती जागा स्वीकारण्यास तयार आहे, या प्रश्नावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेसकडून सन्मानपूर्वक प्रस्ताव आल्यावर विचार करू, असे ते म्हणाले.