रेल्वे स्थानकात येणाऱ्या आगामी गाडीची माहितीही मिळणार

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या वेळापत्रकाची अचूक माहिती देणाऱ्या एम-इंडिकेटर या अ‍ॅपने आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. गुरुवारपासून मुंबईतील पोलीस ठाण्यांचा तपशीलही या इंडिकेटरवर उपलब्ध करून दिला आहे. ज्या रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय उपलब्ध आहे त्या स्थानकावर पुढची गाडी कोणती येणार याची माहितीही पुरविण्यात येणार आहे. अ‍ॅपच्या नव्या आवृत्तीत हा बदल करण्यात आला आहे.

लोकल, एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकासोबतच बेस्ट, टीएमटी, केडीएमटी, एनएमएमटी अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाहतूक व्यवस्थेचा तपशील या अ‍ॅपमध्ये असेल. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणच्या पोलीस ठाण्याचा तपशीलही उपलब्ध होणार आहे. कंपनीने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने ‘मुंबई पोलीस’ या स्वतंत्र आयकॉनमध्ये हा तपशील दिला आहे. यात जीपीएस प्रणालीद्वारे आपल्या आसपासच्या पोलीस ठाण्याचा तपशील मिळणार आहे. पोलीस ठाण्याचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, तेथे जाण्यासाठी गुगलची दिशादर्शक प्रणाली, छोटय़ा तक्रारी नोंदविण्याची सुविधा, सायबर पोलीस ठाण्याचा तपशील उपलब्ध असेल. याचबरोबर मोफत वाय-फाय असलेल्या स्थानकांवर पुढील गाडीची माहिती पुरविली जाणार आहे.

ॅपच्या नव्या आवृत्तीत इतर अद्ययावत सेवा

  • पश्चिम रेल्वेचे सुधारित वेळापत्रक.
  • बेस्ट बसच्या मार्गाची अद्ययावत माहिती.
  • बाहेरगावच्या गाडय़ांचे सुधारित वेळापत्रक.