* दोन वर्षांत एकही चकमक नाही  * सर्व चकमकफेम अधिकारी पडद्याआड
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा थरकाप उडविणाऱ्या आणि वर्षांमागे किमान ५० नामचीन गुंडांना यमसदनी धाडणाऱ्या मुंबई पोलिसांची गेल्या दोन वर्षांत एकाही कट्टर गुंडाशी चकमक न झाल्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेक कट्टर गुंड चकमकीविना पोलिसांनी जेरबंद केले आहेत.
‘चकमकफेम’ अशी बिरुदावली मिरवीत प्रामुख्याने १९९६ ते २००३ मध्ये संघटित गुन्हेगारीचा पर्दाफाश करणारे प्रदीप शर्मा, रवींद्रनाथ आंग्रे, प्रफुल्ल भोसले, दया नायक आदी एकापेक्षा एक चकमकफेम अधिकारी येनकेनप्रकारेण अडचणीत आले आणि ते प्रसिद्धीपासूनही दूर गेले. विजय साळसकर हे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले. त्यांची जागा घेणारा एकही अधिकारी त्यानंतर निर्माण झाला नाही की, पोलिसांनी चकमकींना सुट्टी दिली, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.
पोलीस आणि गुंड यांच्यातील चकमक नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. तरीही १९९६ पासून अगदी २०१० पर्यंत मुंबई पोलिसांची गुंडांबरोबर चकमक होत होती. परंतु अनेक प्रकरणे अंगाशी येऊ लागल्यानंतर अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘चकमक नको’, अशी भूमिका घेतल्याचे बोलले जाते. पोलीस आयुक्तांची साथ नसेल, तर गुंडांशी चकमक शक्य नाही असे एका अधिकाऱ्यानेच बोलून दाखविले. एखाद्या गुंडाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पाळत ठेवतो, मात्र रक्तपात होणार नाही याची खबरदारी घेतो. परंतु या धोरणामुळे कधीकधी तो गुंड निसटूनही जातो, असा दावाही या अधिकाऱ्याने केला. १ नोव्हेंबर २०१० नंतर एकही चकमक झालेली नाही, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले.
चकमकफेम अधिकाऱ्यांची सद्य्स्थिती  
प्रदीप शर्मा – लखनभय्या चकमकीप्रकरणी सध्या तुरुंगात (लखनभय्या चकमक योग्य असल्याचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचा निवाडा)
रवींद्रनाथ आंग्रे – राज्य पोलिसांच्या सेवेत.
प्रफुल्ल भोसले – गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक आयुक्त
दया नायक – मुंबई पोलिसांच्या सेवेत.
१९९६ ते २०१० मध्ये झालेल्या चकमकी
 २०१०- ७; २००९- ८; २००८- ११; २००७- १३; २००६- १६ ; २००५- १३; २००४- १५; २००३- ४०; २००२- ४७; २००१- ९४; २०००- ७३; १९९९- ८२; १९९८- ४८; १९९७- ७१; १९९६- ५८.