अशोक चव्हाण यांची आघाडीवरून सूचना
कल्याण-डोंबिवलीमध्ये आघाडी व्हावी ही काँग्रेसची प्रामाणिक इच्छा आहे, पण हा सारा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसवर अवलंबून असल्याचे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी चेंडू राष्ट्रवादीच्या कोर्टात ढकलला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आघाडीबाबत फार काही प्रगती झाली नाही. दोन्ही पक्षांकडून जादा जागांवर दावा करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांच्या जागांवर दावा केला आहे. आघाडीची शक्यता मावळल्याने काँग्रेसने सर्व १०१ प्रभागांमधील उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. आघाडी करण्याची आमची तयारी आहे. जास्त जागांची मागणी करण्यापेक्षा निवडून येण्याची क्षमता हा घटक महत्त्वाचा आहे. राष्ट्रवादीकडून काही प्रमाणात जादा जागांची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने वस्तुस्थितीचा आढावा घेऊन चर्चा केल्यास आघाडीत अडथळा येणार नाही, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीची आघाडी करण्याची तयारी आहे. काही जागांवर एकमत झाले आहे. शनिवारी पुन्हा चर्चा होऊन आघाडीला मूर्त स्वरूप येऊ शकेल, असा अंदाज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.