मुंबईहून विरार, कर्जत, कसारा, पनवेल या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांमधील महिलांच्या डब्यात रात्री १० नंतर पोलीस सुरक्षा देण्याचा विचार लोहमार्ग पोलीस करीत आहेत, तर मुंबईकडे (अप) येणाऱ्या गाडय़ांमध्ये रात्री नऊनंतर लोहमार्ग पोलिसांचे सशस्त्र जवान तैनात ठेवण्याचा विचार लोहमार्ग पोलीस करत आहेत. मात्र याबाबत प्रवासी संघटना, महिला प्रवासी प्रतिनिधींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल.महिलांच्या डब्यात घुसून विनयभंगाचे प्रकार, चोरीचे प्रयत्न अथवा महिलांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी रात्री आठपासून सकाळी सहापर्यंत महिलांच्या डब्यात लोहमार्ग पोलीस तैनात ठेवण्याचा निर्णयही झाला आहे. मात्र लोहमार्ग पोलिसांकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात सुरक्षेसाठी पोलीस तैनात करण्यात अडचणी येत आहेत.पोलिसांकडे मनुष्यबळ वाढेपर्यंत रात्री आठऐवजी थोडे उशिरा पोलीस तैनात करून ही त्रुटी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करता येईल का, असा विचार चालल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.मुंबईहून विविध ठिकाणी जाणाऱ्या गाडय़ांमध्ये महिलांच्या डब्यात रात्री १० पर्यंत गर्दी असते, मात्र १० नंतर ही गर्दी विरळ होते. त्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर असतो. त्यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या गाडय़ांमध्ये रात्री १० नंतर सुरक्षा जवान तैनात करण्यात येतील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
तरच सुरक्षा शक्य
सध्या लोहमार्ग पोलिसांकडे असलेल्या पदांपैकी ४५०हून अधिक पदे रिक्त आहेत. ही पदे भरल्यास महिलांना पूर्ण सुरक्षा देणे शक्य होईल. त्याशिवाय गृहरक्षक दलाच्या २०० जवानांची मदत मिळाल्यास महिलांचा प्रवास विनासायास पार पडेल, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.