विधानसभा निवडणुकांपासूनच बिनसलेले शिवसेना-भाजप युतीचे सूत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तुटल्याचे जवळपास स्पष्ट झालेले असतानाच आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर सुधींद्र कुलकर्णींवरील शाईफेक प्रकरणावर भाजपने शिवसेनेवर जाहिरपणे टीका केल्याने उभय पक्षांमधील दरी आणखीन रुंदावली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर प्रचंड नाराज असून ते आपल्या मंत्र्यांना केंद्र आणि राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा आदेश देऊ शकतात. शिवसेना नेत्यांच्या  सोमवारी रात्री झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्यात सत्तेतून बाहेर पडण्याबाबत तसेच कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ मुंबई महापालिकेतही भाजपशी काडीमोड घेण्यावर चर्चा झाल्याचे समजते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेला भाजपने डावलेले. तर, शिवसेनेच्या शाई-राड्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी सेनेचा विरोध मोडून कसुरींच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम सोमवारी कडेकोट बंदोबस्तात पार पाडला. कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने जे काही घडले, ते राज्याची बदनामी करणारे आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या राडेबाजीवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. त्यामुळे सेना नेत्यांमध्ये भाजपविरोधातील वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासूनच्या  घडामोडींवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये उडालेले हे खटके आता विकोपाला गेले असून शिवसेना फडणवीस सरकारचा पाठिंबा काढून घेऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तळात काल पासूनच सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघेल. सत्तेची समीकरणच बदलतील आणि भाजपसमोर मोठी कोंडी निर्माण होईल.