अनेक महत्त्वाच्या परीक्षांचा निकाल रखडविणे, सदोष निकाल जाहीर करणे, निकाल जाहीर केले तरी गुणपत्रिका देण्यास विलंब करणे अशा अनेक घोळांना तोंड दिल्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विभागात फोटोकॉपीसाठी वणवण सुरू झाली आहे.बीए, एमए, एलएलबी, बीई अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल दीड-दोन महिने रखडविणे, निकाल जाहीर केले तर गुणपत्रिका देण्यास विलंब करणे, सदोष निकाल जाहीर करणे अशा कितीतरी कारणांमुळे विद्यापीठाचा परीक्षा विभाग यंदा गाजतो आहे. परंतु, निकाल जाहीर झाल्यानंतरही विद्यार्थ्यांची वणवण संपलेली नाही. कारण, आता उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीकरिता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना तंगविणे सुरू झाले आहे. आता जाहीर झालेल्या तर सोडाच. पण, नोव्हेंबर, २०१४मध्ये फोटोकॉपीकरिता अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही. यंदा २६ जूनला विद्यापीठाने पहिला मोठा (तब्बल ५५ दिवसांच्या विलंबाने) म्हणजे टीवायबीकॉम परीक्षेचा निकाल ऑनलाईन घोषित केला. महिनाभरानंतर या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळाल्या. त्यानंतर विद्यापीठाने १७ जुलैला बीएमएसचा निकाल जाहीर केला. त्यांनाही निकालपत्र देण्यास विद्यापीठाने असाच विलंब केला. आता या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीकरिता अर्ज केले आहेत. नियमानुसार सात ते आठ दिवसात फोटोकॉपी मिळणे आवश्यक आहे. मात्र, दोन महिने झाले तरी या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपी मिळालेल्या नाहीत.

‘त्यातून यंदा निकालात अनेक दोष राहून गेल्याने विद्यार्थ्यांची फोटोकॉपीकरिता अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, प्रत्येक फोटोकॉपीसाठी ५०० ते ५५० रुपयांदरम्यान शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मिळू शकलेल्या नाहीत. यात बीकॉम-बीएमएसचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने आहेत. फोटोकॉपीला विलंब झाला की पूनर्मूल्यांकनाचा निकालही लांबणार. तोपर्यंत पुढच्या परीक्षा आलेल्या असतात. काही विद्यार्थ्यांना हा निकाल लांबल्यामुळे पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेशही रद्द करावे लागतात. त्यांचे हे शैक्षणिक नुकसान विद्यापीठ असे भरून काढणार,’ असा सवाल माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला.विद्यापीठाच्या परीक्षा विभागात आदीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. त्यामुळे, कामाची बहुतांश भिस्त कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर असते. त्यातून विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पुनर्मूल्यांकनांच्या निकालात गैरप्रकार करणारे परीक्षा विभागातील तीन अधिकारी व एक कर्मचारी सध्या निलंबित आहेत. त्यांच्या जागी नवे कर्मचारी न आल्यामुळे परीक्षा विभागातील कामाचा ताण वाढला आहे. परिणामी फोटोकॉपी व मूनर्मूल्यांकनाचे काम ठप्प झाल्याचे परीक्षा विभागातील सूत्रांनी सांगितले.