भाजपला दिलेल्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी तसा काहीही प्रकार अलिबागच्या चिंतन शिबिरात झालाच नाही, अशी सारवासारव पक्षाच्या वतीने गुरुवारी करण्यात आली. भाजप सरकार पडणार नाही याची खबरदारी घ्यायची, पण त्याच वेळी विविध मुद्दय़ांवर सरकारच्या विरोधात सभागृहात आक्रमक व्हायचे, अशी दुहेरी भूमिका घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे.
विरोधात बसून पक्ष वाढवू या, पण भाजपची साथ नको, अशी भूमिका अलिबागमधील शिबिरात काही नेत्यांनी सडेतोडपणे मांडली.  भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला पाठिंबा देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. अन्य काही नेत्यांनी यावर भाष्य केले. मात्र, भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयावर आपण वा अन्य कोणी विरोधी मत व्यक्त केलेले नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पाठिंब्यावरून काही नेत्यांनी विरोधी सूर लावला होता. निवडणुका कोणालाही परवडणाऱ्या नाहीत यामुळेच बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.