राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढण्याबरोबरच रँक वाढण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यावर्षी अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाची पाश्र्वभूमी असलेल्या उमेदवारांना अधिक संधी मिळाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
एकीकडे राज्यातील यशस्वी मुलांच्या शतकाचा आनंद आहे, पण टॉपर्स कमी झाले आहेत. पण असे होतच असते. अलीकडेच राज्याला चांगले यश मिळत असतानाच एका वर्षी राज्यातील पहिला हा देशातील १०३ वा होता, तर दोन वर्षांपूर्वी पहिल्या दहात महाराष्ट्राचे तिघे होते. ‘सीसॅट’मुळे अभियंते जास्त येत आहेत हे म्हणणे चूक आहे. सीसॅट काढणे हे एक पाऊल मागे टाकण्याजोगे होईल. क्लाससंस्कृतीच्या दबावामुळे हे होतेय. शास्त्रीय मुद्दा असा आहे की, जे काम करायचेय ते गुण तुमच्या व्यक्तिमत्त्वात आहेत का हे तपासण्यासाठी ते आहे. ते नाकारणे योग्य नाही.
– अविनाश धर्माधिकारी, संस्थापक, चाणक्य मंडल
****
मागच्या वषीच्या तुलनेत महाराष्ट्ररातील विद्यार्थ्यांना आकडा चांगलाचा वाढतोय. याही पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संधी आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाते. तसेच तेथे उत्तरपत्रिका तपासणाऱ्या तज्ज्ञांच्या विचारांशी आपले विचार जुळणे महत्त्वाचे असते. यामुळे आपण त्या दर्जाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सध्या राज्यातील विद्यार्थ्यांची मानसिकता बदलत असून लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे त्यांचा कल वाढतो आहे ही चांगली बाब आहे.
 – अजित पडवळ, संचालक, लक्ष्य अकादमी

****
यंदाच्या निकालात मराठी मुलांची संख्या वाढली असली तरी त्यांचा अग्रक्रम मिळवण्यात यश आलेले नाही. यावरून मुलांनी केवळ नोट्सवर अवलंबून न राहता अवांतर वाचन करण्याची गरज आहे. तसे केल्यावरच आपण मोठी उत्तरे चांगल्या प्रकारे लिहू शकतो. याचबरोबर सनदी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहीजे. म्हणजे त्यांना त्या मार्गदर्शनाचा फायदा उत्तरे लिहताना तसेच मुलाखतीच्या वेळेस होऊ शकतो.
– रुपाली रोकडे, संचालिका, संकल्प आयएएस फोरम

अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाची पाश्र्वभूमी असलेले ७० ते ७५ टक्के उमेदवार आहेत. गणित विषयाची पाश्र्वभूमी आणि इंग्रजी माध्यम याचा फायदा या विद्यार्थ्यांना झालेला दिसतो आहे. मराठी विद्यार्थ्यांना कमी संधी मिळालेली दिसत आहे. पुढील वर्षीपासून सीसॅट पात्रतेपुरतीच गृहीत धरण्यात येणार असल्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होईल. मुलींचे आणि मुस्लीम वर्गातील उमेदवारांचे प्रमाण वाढण्याची आवश्यकता आहे.
– तुकाराम जाधव, संचालक, द युनिक अ‍ॅकॅडमी