राष्ट्रीय मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या काही तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.
मोबाइल नेटवर्कसाठी ग्राहकाला आवडेल ती कंपनी निवडण्याचा अधिकार देण्यासाठी मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा सुरू करण्यात आली. ही सुविधा सध्या एका वर्तुळापुरतीच मर्यादित आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर काही काळांत ती देशव्यापी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. यानुसार दूरसंचार नियमन प्राधिकरण (ट्राय)ने फेब्रुवारी महिन्यात यासंदर्भात सूचना जाहीर करून ही सुविधा ३ मेपासून सुरू करावी, असे मोबाइल कंपन्यांना कळविले. मात्र १३ एप्रिल रोजी दूरसंचार विभागातर्फे नंबर पोर्टेबिलिटीसंदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली. या नियमावलीची पूर्तता ३ मेच्या अवधीत पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे मोबाइल कंपन्यांच्या संस्थेने राष्ट्रीय नंबर पोर्टेबिलिटी सुविधा देण्यासाठी आणखी मुदत द्यावी अशी मागणी केली. यानुसार ट्रायने दोन महिन्यांचा अवधी दिला आहे.
दूरसंचार विभागाच्या नवीन नियमांनुसार राष्ट्रीय नंबर पोर्टेबिलिटी करताना मोबाइल कंपन्यांनी मोबाइल क्रमांकामधील काही क्रमांक दूरसंचार वर्तुळ सुचवेल असे असावेत असे नमूद केले आहे. याचबरोबर दूरध्वनी करताना मूळ क्रमांकाच्या आधी ‘०’ किंवा ‘+९१’ न लावताही फोन करता यावा, असेही सुचविले आहे. दूरसंचार विभागाचे हे नवीन आदेश काही दिवसांपूर्वीच मिळाले त्यानुसार आणखी काही तांत्रिक बदल आणि चाचण्या कराव्या लागतील. यामुळे हा अवधी वाढवून मागण्यात आल्याचे कंपन्यांच्या संस्थेमार्फत स्पष्ट करण्यात आले.