आपल्या हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी २३ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या खटल्यात साक्ष देण्याची ‘बॉम्बे डाइंग’चे अध्यक्ष नसली वाडिया यांची मागणी विशेष सीबीआय न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे ३० जून रोजी वाडिया यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे.
प्रसिद्ध उद्योगपती नसली वाडिया यांच्या हत्येचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी २३ वर्षांपूर्वी हाणून पाडला होता. याप्रकरणी किरीट अंबानी याच्यावर खटला चालविण्यात येत आहे. त्यानेच वाडिया यांच्या हत्येचा कट रचल्याचा सीबीआयचा दावा आहे. त्या काळी वाडिया यांचा एका प्रसिद्ध उद्योगपतीशी व्यावसायिक संघर्ष सुरू होता. त्या पाश्र्वभूमीवर वाडिया यांच्या हत्येचा कट उघड झाल्याने राजकीय आणि उद्योग विश्वात खळबळ उडाली होती.
२३ वर्षांपूर्वी आपल्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामागील नेमके काय कारण होते, यावर प्रकाश टाकण्याच्या हेतूने आपल्याला साक्ष द्यायची आहे, असे सांगत त्यासाठी परवानगी मागणारा अर्ज वाडिया यांनी न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांची ही मागणी मान्य करीत साक्षीसाठी कधी हजर राहणार, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. त्यानुसार ३० जून रोजी वाडिया हे साक्षीसाठी हजर होण्याची शक्यता आहे. सीबीआयसुद्धा वाडिया यांची साक्षीदार म्हणून सरतपासणी घेऊ शकते, असेही न्यायालयाने वाडिया यांचा अर्ज मंजूर करताना स्पष्ट केले. मात्र सीबीआयची तशी इच्छा नसेल, तर न्यायालयाचे साक्षीदार म्हणून वाडिया यांची साक्ष नोंदविण्यात येईल.