अत्यंत दाटीवाटीच्या सध्या ठिकाणी सर्पदर्शन होत आहे. वर्षभरात एखाद्या कपारीत किंवा बिळात लपणारे व माणसांना चुकवणारे हे शीतरक्ताचे सरपटणारे जीव सध्या मात्र बिनदिक्कत फिरताना दिसतात. हवेतील अचानक वाढलेला उकाडा त्यासाठी कारणीभूत असल्याचे प्राणीमित्रांचे म्हणणे आहे.

सध्या मुंबईत अनेक ठिकाणी साप दिसल्याच्या, पकडल्याच्या, सापाने दंश केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. दक्षिण मुंबईतील एका इमारतीत लागोपाठ दोन दिवस साप आढळले. पहिल्या दिवशी विषारी घोणस तर दुसऱ्या दिवशी नाग या इमारतीच्या आवारात आढळून आले. भिवंडी येथील वाहनांच्या आत चार दिवस साप राहिला होता. पवई, मुलुंड, आरे कॉलनी, बोरीवली परिसरात साप दिसण्याचे प्रमाण अधिक असले तरी दक्षिण मुंबईतही अनेक ठिकाणी साप दिसतात, असे प्लॅण्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटीच्या (पीएडब्ल्यूएस) सुनिश कुंजू यांनी सांगितले.

अनेक वष्रे साप पकडत असलो तरी पहिल्यांदाच यावेळी तीन ठिकाणी साप जोडीने दिसले. पवई तलावाच्या जॉिगग ट्रॅकमधून धामण या बिनविषारी सापाची लहान पिले सापडली. मुलुंडच्या आग्रा रोडवरून धामणाचीच जोडी सापडली तर भांडुपच्या अरुणोदय टॉवरमधून घोणस या विषारी सापाची जोडी पकडून नंतर जंगलात सोडून देण्यात आली, असे कुंजू म्हणाले. अर्थात सर्पदर्शन वाढले तर त्यात घाबरण्यासारखे काही नाही.  साप हे शीतरक्ताचे प्राणी आहेत. शरीराचे तापमान नियंत्रित करणाऱ्या ग्रंथी त्यांच्यात नसतात, त्यामुळे वातावरणात झालेल्या हलक्याशा बदलानेही त्यांच्या शरीराचे तापमान कमी जास्त होते. हे तापमान नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ते जागा बदलतात. तापमान वाढले की ते ओलावा, थंड जागेचा शोध घेतात तर थंडी वाढली की उबदार निवाऱ्यासाठी फिरतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला बिळात पाणी साठल्यावर जसे साप बाहेर पडतात.