ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीप्रमाणे मुंबईतही वाहनांसाठी ‘सम-विषम’ सूत्र लागू करण्याचे आदेश देण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. मात्र मुंबईसारख्या शहरात जेथे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे ही तारेवरची कसरत समजली जाते तेथे हे सूत्र लागू करणे किती व्यवहार्य आहे, ते लागू केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, असा सवाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी केला. तसेच कायदेशीर तरतूद नसताना न्यायालय सरकारला असे आदेश देऊ शकते का, अशी विचारणाही न्यायालयाने केली आहे.
ध्वनी आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीप्रमाणे मुंबईतही वाहनांसाठी ‘सम-विषम’ सूत्र लागू करण्याचे आदेश देण्याची मागणी शादाब पटेल यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस न्यायालयाने याचिकाकर्त्यांला अशी मागणी केलीच कशी जाऊ शकते असा सवाल केला. मुंबईसारख्या शहरात वृद्ध, अपंग लोकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणे शक्य नाही. सुट्टय़ांच्या दिवशीही लोकलमध्ये शिरणे कठीण असते. अशा परिस्थितीत मुंबईसारख्या शहरात वाहनांसाठी ‘सम-विषम’ सूत्र लागू करणे किती व्यवहार्य आहे, त्याचे काय परिणाम होऊ शकतात, अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली.