काळबादेवी येथील भीषण आग विझविताना मृत्यूमुखी पडलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना शहीदांचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे दिली. अग्निशमन दलातील अधिकारी सुधीर अमीन यांच्या कुटुंबियांची ठाकरे यांनी भेट घेतली.
काळबादेवीतील गोकुळनिवास या इमारतीला लागलेली आग विझविताना अग्निशमन दलाचे दोन अधिकारी महेंद्र देसाई आणि संजय राणे यांचा मृत्यू झाला होता. तर अमीन हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरु होते. ते सुरु असतानाच अमीन यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अमीन यांच्या कुटुंबियांनी महापालिकेने दिलेली मदत नाकारली होती. अमीन यांना शहीद म्हणून घोषित करण्याची मागणी केली  होती. ठाकरे यांनी अमीन यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. ही आग विझविताना मृत्यूमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांना शहीद म्हणून दर्जा देण्यात यावा, असा प्रश्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत.