मुंबईतील शिवाजी पार्क भागात ४० वर्षांच्या ओला ड्रायव्हरला एका महिलेसमोर अश्लील चाळे केल्याच्या आऱोपावरून अटक करण्यात आली आहे. पीडित महिला ३१ वर्षांची आहे, ती गाझियाबादमधून मुंबईतील परळमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी आली होती. या महिलेनं ओला शेअर कॅब बुक केली होती. अरूण तिवारी असं या ओला टॅक्सी ड्रायव्हरचं नाव आहे.

मंगळवारी पीडित महिला जेव्हा अरूण चालवत असलेल्या टॅक्सीमध्ये ड्रायव्हर सीटच्या शेजारी बसली, तेव्हा तिच्यासमोरच अरूण अश्लील चाळे करू लागला, असा आरोप या महिलेनं केला आहे. तसंच याप्रकरणी तिनं पोलिसात धाव घेतली ज्यानंतर या अरूणला अटक करण्यात आली.

ड्रायव्हर अरूण तिवारीला कलम ३५४ अ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. गाझियाबादवरून आलेल्या या महिलेनं शेअर ओलाचा पर्याय निवडला होता, त्यामुळे तिला जेव्हा टॅक्सी मिळाली तेव्हा ओला कॅबच्या मागच्या सीटवर एक महिला आधीच बसलेली होती. मागील सीटवर बसलेली महिला कारमध्ये असेपर्यंत पीडित महिलेचा प्रवास सुरळीत सुरू होता, मात्र मागील सीटवर बसलेली महिला प्रभादेवीला उतरली ज्यानंतर अरूणनं पीडित महिलेशी सुरूवातीला गप्पा मारायला सुरूवात केली.

गप्पांकडे महिलेनं लक्ष दिलं नाही, त्यानंतर अरूणनं अश्लील चाळे हातवारे करायला सुरूवात केली. ज्याकडे महिलेनं सुरूवातीला दुर्लक्ष केलं, त्यानंतर अरूणनं अश्लील चाळे करायला सुरूवात केली, या प्रकरानंतर या महिलेनं तातडीनं ओला कॅब सोडली आणि ती मुलाखतीसाठी गेली. तिची नोकरीसाठीची मुलाखत झाल्यानंतर तिनं अरूण तिवारीसंदर्भात पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी ओला कंपनीत फोन करून अरूणची माहिती मिळवली.

अरूण दादरमध्ये दुसऱ्या एका प्रवाशाला सोडण्यासाठी गेला आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी अरूण नेमका कुठे आहे ते ठिकाण शोधलं आणि त्याला अटक केली. अरूण तिवारीचं लग्न झालं असून त्याला दोन मुलं आहेत. पोलिसांनी अरूण तिवारीला न्यायालयात हजर केलं ज्यानंतर अरूण तिवारीला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबईत महिला आणि मुलींकडे पाहून अश्लील चाळे करण्यात आल्याची ही पहिली घटना नाही. याआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या तपोवन एक्स्प्रेसमध्येही एका मुलीला असाच अनुभव आला होता. तर पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरूणीलाही असाच अनुभव आला होता. आता असंच प्रकरण पुन्हा एकदा उघडकीस आलं आहे, या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस नेमकं काय करणार? असा प्रश्न आता महिला वर्गाकडून विचारला जातो आहे. तसंच या प्रकरामुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.