बेस्ट उपक्रमातील कामगार आणि अधिकाऱ्यांना दोन टप्प्यांमध्ये वेतन देण्याची घोषणा करण्यात आल्यामुळे अखेर बेस्टमधील कामगार संघटनांनी मंगळवारी पुकारलेला संप तूर्तास मागे घेतला. त्यापाठोपाठच मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याच्या अपेक्षेमुळे ओला-उबेर या खासगी टॅक्सी व्यवसायातील चालकांनी उपसलेले संपाचे हत्यार म्यान केले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक आणि ओला-उबेरवर अवलंबून असलेल्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

तोटय़ाच्या गर्तेत रुतत चाललेल्या बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचे वेतन निम्मा मार्च लोटल्यानंतरही मिळू शकलेले नाही. कामगारांना सोमवापर्यंत वेतन मिळाले नाही, तर मंगळवारपासून संप पुकारण्यात येईल, असा इशारा बेस्टमधील कामगार संघटनांनी दिला होता. मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये मंगळवारी कर्मचाऱ्यांना आणि बुधवारी अधिकाऱ्यांना वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बेस्टमधील कामगार संघटनांनी पुकारलेला संप सोमवारी मागे घेतला. मात्र एका महिन्याच्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे वेतनासह अन्य विविध प्रश्नांबाबत येत्या तीन दिवसांमध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक आणि अन्य यंत्रणांतील जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच कामगारांबरोबरही याबाबत चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाईल, असे बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी सांगितले.

ओला आणि उबेर कंपन्यांकडून एक ते सवा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल, असे आमिष चालकांना दाखविण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र १५ ते २० हजार रुपये चालकांना मिळत आहेत. त्यातच भाडय़ाचे दर दिवसेंदिवस कमी होत असून त्यामुळे चालकांच्या उत्पन्नातही घट होऊ लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया वेल्फेअरसह तीन संघटनांनी संप पुकारला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून या संदर्भात दिल्ली न्यायालयात खटला सुरू आहे. या खटल्याचा निकाल आल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे संघटनेतील सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असून त्यामुळे संप मागे घेण्यात येत असल्याचे काही कामगार नेत्यांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी आझाद मैदानात धरणे आंदोलन केल्यानंतर मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याची हाक या संघटनांनी दिली होती. दरम्यान, ओला-उबेर चालकांशी संबंधित तीन संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि १४ मार्च रोजी आझाद मैदानात झालेल्या आंदोलनातही त्याचे पडसाद उमटले. आंदोलनाबाबत स्थापन करण्यात आलेली कृती समिती आणि अन्य संघटनांमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे अखेर मंगळवारी पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आल्याची चर्चा चालकांमध्ये सुरू होती.