नवीन २०१३ वर्ष बँकांच्या ग्राहकांसाठी एक सुखद बातमी घेऊन येईल. बँकांकडून धनादेशांची वठणावळ अतिवेगवान आणि जोखीमरहित करणारी नवीन ‘धनादेश प्रणाली’ सर्वच वाणिज्य बँकांकडून अगदी ग्रामीण बँका तसेच सर्व सहकारी बँकांकडून लागू केली जाईल. देशभरातील संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत धनादेश वठणावळीत सामायिकता आणणारी ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम (सीटीएस २०१०)’ सर्व प्रकारच्या बँकांनी ३१ डिसेंबर २०१२ पर्यंत अंमलात आणावयाची असून, त्यायोगे सध्या वापरात असलेले धनादेश रद्दबातल ठरून त्याजागी नव्या ‘सीटीएस’ प्रणालीनुसार रचना केले गेलेले धनादेश बँकांना ग्राहकांना द्यावे लागतील. किंबहुना ग्राहकांना नव्या वर्षांची पहाट उगविण्यापूर्वी आपली धनादेश-पुस्तिका नव्या प्रणालीनुसार अद्ययावत करण्याची काळजी घ्यावी लागेल.
रिझव्‍‌र्ह बँकेने १ ऑक्टोबर २०१२ रोजी सर्व बँकांसाठी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, नवीन ‘सीटीएस २०१०’ ही प्रणाली १ जानेवारी २०१३ पासून लागू करण्याचे ठरविले आणि ग्राहकांकडील जुन्या धनादेश-पुस्तिका परत घेऊन त्याजागी नव्या प्रणालीशी सुसंगत अशा अद्ययावत धनादेश-पुस्तिका देण्याचे आदेश दिले आहेत. बहुतांश बँकांनी प्रामुख्याने नव्या पिढीतील खासगी बँकांनी या दिशेने तत्परता दाखवीत, ऑक्टोबरपासूनच नव्या धनादेशांची   मागणी करणाऱ्या ग्राहकांना अद्ययावत स्वरूपाच्या धनादेश-पुस्तिका द्यायला सुरुवातही केली आहे. तथापि सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ग्रामीण बँका व तसेच नागरी सहकारी बँका यांनी मात्र ग्राहकांपर्यंत हा नवीन बदल पोहचविण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही.
बँकांच्या शाखा तसेच एटीएममध्ये या संबंधी सूचना चिकटविण्यापलीकडे विशेष काही केले गेले नसल्याचे एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या बडय़ा अधिकाऱ्याने कबुलीदाखल सांगितले. नवीन ‘सीटीएस’ प्रणालीनुसार जारी केल्या जाणाऱ्या धनादेशांची काही ठळक सामायिक वैशिष्टय़े असतील. धनादेश जारी करणाऱ्या बँकेचे बोधचिन्ह, धनादेशांची छपाई करणाऱ्या मुद्रकाचा तपशील, उजव्या बाजूला अंकात रक्कम नमूद करावयाच्या चौकटीत रुपयाचे नवीन बोधचिन्ह, डाव्या बाजूला खाते क्रमांकाच्या खालच्या रिक्त जागेत प्रत्येक बँकेचे अनोखे पेंटोग्राफ आणि धनादेश देणाऱ्याची सही अशी नवीन सामायिक वैशिष्टय़े असतील आणि या प्रत्येकाच्या धनादेशावरील जागाही ठरलेल्या असतील.