मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या ‘मास्टर इन लॉ’ (एलएलएम), एमफिल आदी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांकरिता ‘जगन्नाथ शंकरशेठ विद्यार्थी वसतिगृहा’त राखीव असलेल्या जागांवर जुन्याच विद्यार्थ्यांनी वर्षांनुवर्षे डेरा जमविल्याने नव्याने प्रवेश घेतलेल्या मुंबईबाहेरील गरजू विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहात जागा मिळणे दुरापास्त झाले आहे. नियमांमधील कच्च्या दुव्यांचा फायदा घेत खोल्या बळकावणारे हे बहुतांश विद्यार्थी वकिली व्यवसायही करीत आहेत. त्यापैकी एक तर ‘भारतीय जनता पक्षा’च्या कायदेशीर सल्ला विभागात कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्यासही नवे विद्यार्थी कचरतात. परिणामी, हा सावळागोंधळ येथे वर्षांनुवर्षे सुरू आहे.
या वसतिगृहात दहा जागा एलएलएमला, तर एक एमफिलकरिता राखीव आहेत. एलएलएम आणि एमफिल हे दोन्ही अभ्यासक्रम दोन वर्षांचे आहेत. त्यामुळे दोन वर्षांनी वसतिगृहाची खोली सोडावी लागते, परंतु मुंबईसारख्या ठिकाणी स्वस्तात जागा मिळणे कठीण. त्यातून वसतिगृहात मिळणारे अन्नही पैशाच्या तुलनेत चांगल्या दर्जाचे. बाहेर भाडय़ाने जागा घेण्याकरिता भरावी लागणारी लाखो रुपयांची अनामत रक्कम किंवा हजारो रुपयांचे भाडे यापेक्षा अभ्यासक्रमाचे व वसतिगृहाचे नाममात्र शुल्क परवडते. त्यामुळे पुन्हा एलएलएमला प्रवेश घेऊन काही विद्यार्थी वर्षांनुवर्षे या ठिकाणी डेरा जमवून बसले आहेत.
एलएलएमचे सहा विषयगट असतात. वसतिगृह सोडावे लागू नये म्हणून विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या विषयगटांना प्रवेश घेत राहतात. त्यामुळे वर्षांनुवर्षे तेचतेच विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याचे दिसून येते. सध्या चार-पाच विद्यार्थी गेली चार-पाच वर्षे या पद्धतीने वसतिगृहात राहत आहेत. या प्रकाराचा नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होतो. एमफिलच्या विद्यार्थ्यांची तीच अडचण तर एमफिललाही दोन वर्षांनंतर विद्यार्थ्यांला खोली रिकामी करावी लागते. परंतु परीक्षाच द्यायची नाही आणि जागा अडवून ठेवायची, असे प्रकार विद्यार्थी करतात. जुनेच विद्यार्थी जर खोल्या अडवून असतील तर नव्या गरजू विद्यार्थ्यांची वसतिगृहात राहण्याची सोय होणार कशी, असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने केला.
एमफिल नाहीतर एलएलएमची जागा
येथे एक विद्यार्थी एलएलएमच्या नावाने लागोपाठची चार वर्षे वसतिगृहात राहत आहे. आता याच विद्यार्थ्यांने एमफिललाही प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आता पुढली दोन वर्षे तो येथे राहण्यास पात्र ठरेल. तर आणखी एक विद्यार्थी एमफिलसाठीच्या राखीव जागेवर राहत आहे. तो एमफिलचे पेपरच देत नाहीत. त्यामुळे तोच वर्षांनुवर्षे राहत आहे. आता त्याच विद्यार्थ्यांने एलएलएमलाही प्रवेश घेतला आहे. त्यामुळे एलएलएमच्या नावाने पुन्हा जागा मिळविण्याचा त्याचा प्रयत्न आहे, नाहीतर एमफिलची जागा आहेत, अशी त्याची योजना आहे. हा प्रकार काही विद्यार्थ्यांनी विभागाच्या लक्षात आणून दिला, परंतु दोन-चार वर्षे एकाच विभागात राहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे विभागातील प्राध्यापकांशी, कर्मचाऱ्यांशीही संबंध चांगले झाले आहेत. त्यामुळे शिक्षकही काही निर्णय घेत नाहीत.