‘चला, तिकीट बोला.. तिकीटऽऽऽ’, अशी हाळी देत हातातला चिमटा वाजवत आणि तिकिटांची पत्र्याची पेटी सांभाळत एसटीच्या गाडय़ांमध्ये फिरणारे वाहक गेल्या काही वर्षांपासून दुर्मिळ झाले आहेत; मात्र एसटीने मशीनद्वारे तिकीट देण्यास सुरुवात केल्यानंतर वाहकांच्या हातातून गेलेला हा चिमटा आता काही काळासाठी पुन्हा त्यांच्या हाती येणार आहे. एसटीच्या आगारात पडून असलेली जुनी तिकिटे संपवण्यासाठी एसटीने दादर-पुणे मार्गावरील हिरकणी फेऱ्यांसाठी ही तिकिटे वापरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यामुळे प्रवासी आणि कर्मचारी या दोघांमध्येही नाराजी आहे.
तीन-चार वर्षांपूर्वी एसटीने ट्रायमॅक्स या कंपनीसह करार करत आधुनिक पद्धतीने मशीनद्वारे तिकिटे देण्यास सुरुवात केली. या मशीनमुळे प्रवाशांना पटकन तिकिटे मिळू लागली. तसेच या तिकिटांचा हिशोब मशीनमध्येच होत असल्याने वाहकांचे निम्मे काम कमी झाले. खांद्यावरच्या पेटीमध्ये तिकिटे घेऊन फिरणे बंद झाल्याने जवळपास सर्वच वाहकांनी सुटकेचा नि:श्वासही सोडला. या प्रणालीला तब्बल तीन-चार वर्षे झाल्यानंतर मुंबईतील परळसह इतर मोठय़ा आगारांमध्ये छापील तिकिटांचा मोठा साठा पडून असल्याचे एसटी महामंडळाच्या लक्षात आले. ही तिकिटे टाकून देण्याऐवजी ती वापरून संपवून टाकावीत, अशी भूमिका एसटी महामंडळाने घेतली आहे. त्यातूनच महामंडळाने दादर-पुणे मार्गावरील हिरकणी व परिवर्तन गाडय़ांमध्ये ही जुनी तिकिटे विकण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहकांच्या हातात एसटीने ९ जुलैपासूनच पत्र्याची पेटी देऊ केली आहे. या पेटीत जुन्या पद्धतीप्रमाणे तिकिटांच्या थप्प्या असून त्यातून योग्य तिकीट काढून चिमटय़ाने त्यावर खूण करून वाहक प्रवाशांच्या हाती देत आहेत. तसेच खपलेल्या तिकिटांचा हिशोब ठेवण्यासाठी वाहकांना तक्ताही तयार करावा लागत आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असल्याने प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. जग मोबाइल तिकीट प्रणालीकडे चालले असताना एसटी पुन्हा एकदा मागे जात असल्याची टीका प्रवाशांनी केली आहे.