मुंबईच्या पश्चिम उपनगरीय लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून १८७ निरपराध मुंबईकरांसाठी काळ ठरलेल्या १२ पैकी आठ दोषी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे बुधवारी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाकडे करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याचा निकाल ३० सप्टेंबपर्यंत राखून ठेवला. त्यामुळे येत्या बुधवारी या आरोपींना न्यायालय फाशीची शिक्षा सुनावणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कमाल अन्सारी, तन्वीर अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, एहतेशाम सिद्दिकी, शेख मोहम्मद अली, साजिद अन्सारी, नावेद हुसैन आणि आसिफ खान अशा आठ दोषी आरोपींना फाशीची शिक्षाच देणे योग्य होईल, असे स्पष्ट करत विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तर माजिद शफी, अब्दुल वाहिद शेख, मुझम्मिल शेख, सुहैल शेख आणि जमीर शेख या उर्वरित आरोपींना जन्मठेपेची किंवा १६ वर्षांची शिक्षा सुनावण्याची मागणी ठाकरे यांनी न्यायालयाकडे केली. मात्र आरोपींच्या वकिलांतर्फे सरकारी वकिलांच्या या मागणीला जोरदार विरोध करण्यात आला.
तसेच ज्या आठ आरोपींना बॉम्ब ठेवल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणे हे समजू शकते. मात्र उर्वरित तीन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणे अनाकलनीय असल्याचा आरोपही आरोपींच्या वतीने अ‍ॅड. युग चौधरी यांनी केला. त्यावर या तीन आरोपींनी बॉम्ब कुठे ठेवायचे आणि कुठल्या वेळेवर त्यांचा स्फोट घडवून आणायचा याची जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळेच त्यांनाही फाशीची शिक्षा देणे हेच योग्य आहे. उपनगरीय लोकल गाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे अशा गाडय़ांमध्ये कधी बॉम्बस्फोट घडवल्यास किती लोकांचा जीव जाऊ शकतो याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे तेही फाशीची शिक्षा मिळण्यास पात्र असल्याचा दावा ठाकरे यांनी केला. त्यामुळे हे आठही आरोपी १८७ निपराध मुंबईकरांसाठी काळ ठरल्याचे सांगत ठाकरे यांनी त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.