गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची राजकीय कारकीर्द जशी बहरत गेली तसा जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर असलेला मातोश्री क्लबही अधिकाधिक श्रीमंत होत गेला. शिवसेना-भाजप युतीची सत्ता गेल्यानंतर गद्दारी होऊ नये म्हणून काही आमदारांची सोय या क्लबमध्ये करण्यात आली होती. पालिकेने दिलेल्या भूखंडाचा राजकीय वापर करून वायकर यांनी उघड उघड अटींचा भंग करूनही १५ वर्षांनंतरही पालिका भूखंड परत घेऊ शकलेली नाही. हा भूखंड आपण पालिकेला परत द्यायला तयार आहोत परंतु पालिकाच पुढे येत नाही, असे वायकर यांचे म्हणणे आहे.
खेळाचे मैदान म्हणून आरक्षित असलेला हा सुमारे पाच एकर भूखंड १९९६ मध्ये पालिकेने रवींद्र वायकर अध्यक्ष असलेल्या मे. मातोश्री आर्ट्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स ट्रस्टला दिला. खेळाच्या मैदानाची देखभाल करण्यासाठी दिलेल्या या भूखंडावर खेळासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासही मुभा देण्यात आली. मात्र या भूखंडावर महापालिकेचे खेळाचे मैदान असा फलक लावणे या करारानुसार बंधनकारक करण्यात आले होते. परंतु मातोश्री क्लबला भेट दिल्यावर सर्वत्र फक्त वायकरांचाच प्रभाव दिसून येतो. एकूण पाच एकर भूखंडाच्या १५ टक्के भूखंडावर जलतरण तलाव वा अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रमुख अट होती. तसेच यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे काम ५० टक्के भूखंडावर व उर्वरित ५० टक्के भूखंड हा स्थानिकांच्या वापरासाठी खुला ठेवण्याचेही बंधन होते. याशिवाय महापालिका जलतरण तलाव व क्रीडा संकुल असा फलकही लावण्यास सांगण्यात आला होता. परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले असून या क्लबमध्ये स्थानिकांना सदस्य असल्याशिवाय प्रवेश नाही. जलतरण तलाव व क्रीडा संकुलासाठी केलेला खर्च हा पालिकेला दिलेली देणगी समजावी तसेच या सुविधा बांधून पूर्ण झाल्यानंतर तो पालिकेच्या ताब्यात द्यावा. परंतु आजही त्यावर वायकर यांच्या ट्रस्टचीच मालकी आहे.
२००२ मध्ये पालिकेने या भूखंडाचा ताबा घेण्यासाठी मातोश्री क्लबवर नोटीस बजावली होती. या नोटिशीला मातोश्री क्लबने न्यायालयात आव्हान दिले. या क्लबवर १२ कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा क्लबमार्फत करण्यात आला. मात्र शहर व दिवाणी न्यायालयाने पालिकेची बाजू योग्य असल्याचे म्हटले होते. या निर्णयाविरुद्ध क्लबने उच्च न्यायालयात धाव घेतली. पालिकेबरोबर झालेल्या करारात वायकर यांनी या भूखंडावर सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर पालिकेला सुपूर्द करू, असे मान्य केले होते. परंतु आता मात्र ते ही आपलीच मालमत्ता असल्यासारखे वावरत असल्याचा आरोप केला जात आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर उभ्या राहिलेल्या आलिशान इमारतींच्या जाहिराती करताना या क्लबच्या सदस्यत्वाचीही हमी दिली जात आहे. आलिशान लग्नासाठी या क्लबच्या शेजारी असलेल्या भूखंडाला सध्या भलतीच मागणी आहे. ही जागा हडपण्यात आल्याचाही आरोप केला जात आहे.

सुप्रिमो रेस्तराँ आणि बार तसेच लग्नासाठी देण्यात आलेला भूखंड ही आपली वैयक्तिक मालमत्ता आहे. आपण हा क्लब चालविण्यासाठी महापालिकेकडे सुपूर्द करायला तयार आहोत. परंतु पालिकेने करारनामा केलेला नाही. करारनामा करावा आणि क्लब ताब्यात घ्यावा, असे मीच आवाहन करतो. या जागेवर पूर्वी १३ गोठे होते. या गोठेमालकांना हटविण्यासाठी आपण ५३ लाख रुपये दिले. पालिकेची जागा आम्ही सुरक्षित केली. सुरुवातीला फक्त ५३ हजारांत सदस्यत्व दिले. माझ्या परिसरात काही करून दाखवायचे होते ते मी दाखविले आहे
रवींद्र वायकर, अध्यक्ष, मातोश्री क्लब आणि गृहनिर्माण राज्यमंत्री

’भूखंड : पाच एकर; मालकी : महापालिका
’सदस्य शुल्क : दोन ते तीन लाख.
’सुविधा : बार, रेस्तराँ, कॉफी शॉप, जलतरण तलाव आदी.
खेळ : बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, बिलिअर्ड, कार्ड रूम, स्क्व्ॉश आदी
’निवास : काही सूट्स तसेच खोल्या.
’अटी : जलतरण तलाव तसेच क्रीडा संकुलाचे बांधकाम झाल्यानंतर पालिकेच्या ताब्यात देणे, महापालिकेचे खेळाचे मैदान तसेच महापालिका जलतरण तलाव व क्रीडा संकुल असा फलक लावणे, खेळाच्या मैदानात स्थानिकांना खुला प्रवेश.