गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदारांनी नाकारल्याचे चित्र आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मनसेला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या जागांमध्ये घट झाली आहे. एकहाती सत्ता द्या, ही राज ठाकरे यांची मागणी कल्याण-डोंबिवलीकरांनी याहीवेळी पूर्ण केलेली नाही.
एकहाती सत्ता द्या, नाशिकसारखा कल्याण-डोंबिवलीचा विकास करून दाखवतो, या मुद्द्यावर मनसेने कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रचार केला होता. यासाठी स्वतः राज ठाकरे यांनी कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मिळून तीन सभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये त्यांनी नाशिकमध्ये केलेल्या कामाचे सादरीकरणही मतदारांसमोर केले होते. त्याचबरोबर राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या कारभारावर तीव्र टीका केली होती. मात्र, यानंतरही मतदारांनी मनसेला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या इतक्या जागांवरही यश मिळवून दिलेले नाही. गेल्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसे २७ जागांवर विजयी झाली होती. यावेळी मनसेने केवळ ९ ठिकाणी यश मिळवले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या जागांमध्ये घट झाली आहे.
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक मनसेने लढविली नव्हती. मात्र, मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांनी विजय मिळवला असून, पालिकेमध्ये आपण मनसेचेच प्रतिनिधित्व करू, असे त्यांनी विजयानंतर पत्रकारांना सांगितले.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसेला राज्यात केवळ एका जागेवर विजय मिळवण्यात यश आले होते.