राज्यातील वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र या तीनही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पूर्वीप्रमाणेच एकत्रितपणे ‘सामाईक प्रवेश परीक्षा’ (सीईटी) घेणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करीत वैद्यकीय आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. mu06याचबरोबर ही परीक्षा केवळ बारावीच्या अभ्यासक्रमावरच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘विद्यालंकार’ प्रस्तुत ‘लोकसत्ता- करिअर यशाचा’ या परिसंवादाच्या उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थी-पालकांशी संवाद साधताना तावडे यांनी ही घोषणा केली. या तीनही अभ्यासक्रमांकरिता राज्य स्तरावर एकत्रितपणे सीईटी घेतली जात होती. मात्र, केंद्रीय प्रवेश परीक्षांचे वारे वाहू लागल्यानंतर या तीनही अभ्यासक्रमांकरिता विद्यार्थ्यांना स्वतंत्र सीईटी द्याव्या लागत आहेत. परंतु, ‘नीट’ रद्द झाल्याने वैद्यकीय अभ्यासक्रमांकरिता राज्याच्या पातळीवर स्वतंत्र एमएच-सीईटी होते आहे.  एमएच-सीईटीमधील ‘निगेटिव्ह मूल्यांकन’ पद्धत रद्द करण्यात आल्याने आणि याकरिता अकरावी-बारावीऐवजी केवळ बारावीचा अभ्यासक्रम प्रमाण मानला जाणार असल्याने आता या सीईटीमध्ये ‘नीट’चा अंश राहिलेला नाही. त्यानंतर अभियांत्रिकीसाठीही जेईईऐवजी राज्याचीच सीईटी घेण्यात येणार असल्याची घोषणा तावडे यांनी केली.  औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्याच्या स्तरावर गेले दोन वर्षे स्वतंत्र सीईटी होतेच आहे. त्यामुळे, आता या तीन अभ्यासक्रमांकरिता स्वतंत्र सीईटी घेण्याऐवजी पूर्वीप्रमाणे एकत्रित ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात यावी, अशी मागणी होत होती. या एका सीईटीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या चारही विषयांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषयगट निवडून सीईटी देता येत होती. एकच सीईटी द्यावी लागत असल्याने विद्यार्थ्यांचा ताणही कमी होतो. या सर्व बाबी लक्षात घेता या चारही विषयांचा समावेश असलेली एकत्रित सीईटी घेणार असल्याची घोषणा तावडे यांनी केली.
बारावीबाबत अद्याप निर्णय नाही
प्रवेशाकरिता सीईटीबरोबरच बारावीच्या  परीक्षेचे गुण गृहीत धरण्याच्या धोरणाबाबत  निर्णय झाला नसल्याचे तावडे यांनी सांगितले. विविध शिक्षण मंडळांच्या गुणांच्या समानीकरणाचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. त्यामुळे, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, अशी माहिती तावडे यांनी दिली.