अन्न व औषध प्रशासनाकडून उपाययोजना

केंद्र सरकारच्या ई-पोर्टल या योजनेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मंगळवारी, ३० मे रोजी संप पुकारला आहे. मात्र या काळात सर्वसामान्य नागरिक भरडला जाऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून खासगी, शासकीय व निमशासकीय रुग्णालयांना पुरेसा औषधसाठा ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पूर्वीपासूनच ऑनलाइन फार्मसीला विरोध केला आहे. यामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जात असून झोपेच्या गोळ्या किंवा तत्सम धोकादायक औषधांची विक्री केली जाते अशी तक्रारी संघटनेकडून करण्यात आली होती. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने देशातील सर्वच औषध विक्रेत्यांसाठी ई-पोर्टल सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र याला अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने विरोध दर्शविला आणि याविरोधात संपाचे पाऊल उचलले. या संपात राज्यातील ३० हजार तर देशातील साडेआठ लाख औषधे विक्रेते बंद पुकारणार आहेत.

यामध्ये नागरिकांना वेळेत औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी सर्व रुग्णालयांची संलग्न दुकाने, शासकीय रुग्णालयातील औषध भांडार, तसेच बााह्य़रुग्ण विभाग सुरू ठेवण्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाला सांगण्यात आला आहे. नागरिकांना औषधे मिळवीत यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले.

मदतीसाठी संपर्क..

नागरिकांना औषध मिळण्यासंदर्भात अडचणी आल्यास त्यांनी १८००२२२३६५ (टोल फ्री) या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याशिवाय ०२२-२६५९२३६२, २६५९२३६३, २६५९२३६४ व २६५९२३६५ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच राज्यातील विभागीय सहआयुक्त कार्यालय व जिल्हास्तरीय सहायक आयुक्त कार्यालयात नियंत्रक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.