पोलीस डायरीतील गुन्ह्य़ांच्या नोंदी हा मराठी भाषेतील विनोदाचा एक उत्तम नमुना मानला जातो. पोलीसांची प्रसिद्धी पत्रके जशीच्या तशी प्रसिद्ध केल्यास वर्तमानपत्रांचा एक कोपरा ‘विनोदी’ होतो, हे वाचकांनाही माहीत असते. पण तीच भाषा विधिमंडळाच्या सभागृहात थेट मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आली, की गंभीर मुद्दय़ालाही विनोदाची किनार कशी चढते, याचा अनुभव आज विधान परिषदेत सदस्यांना तर आलाच, पण प्रेक्षक गॅलकीतून कामकाज न्याहाळणाऱ्या काही अभ्यागतांचीही थोर करमणूक झाली.

अहमदनगर जिल्ह्य़ातील कोपर्डी बलात्कार प्रकरणावरील चर्चेच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी पाश्र्वभूमी सांगितली, तपासाच्या दिशेबाबतची माहिती दिली, आणि आरोपींचा तपशील देताना पोलीस डायरीतील नोंदी वाचावयास घेतल्या. चौथ्या संशयितासंबंधीचा तपशील देताना तर मुख्यमंत्री पोलीस डायरीच वाचत असावेत, असाच अनेकांचा समज झाला, आणि गंभीर विषयावर चर्चा सुरू असतानाही अनेकांच्या चेहऱ्यावर हास्याच्या रेषा उमटू लागल्या.. ‘आम्ही चौथ्या आरोपीचा सहभाग तपासत आहोत’ असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी त्या संशयिताची पाश्र्वभूमी वाचण्यास सुरुवात केली.. एका जुन्या गुन्ह्य़ासंदर्भातील काही तपशील ते वाचू लागले.. ‘मयताच्या प्रेतावर डॉ. पाटील यांनी शवविच्छेदन केले असता, हृदयविकाराच्या झटक्याने मयताचा मृत्यू झाल्याचे मयताच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे. मयत छतावरून पडून बेशुद्ध झाल्याने मयतास उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. साडेनऊला मयतास मृत घोषित करण्यात आले.. मयताचा खून झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, परंतु वस्तुस्थिती खरी आहे का, याची चौकशी केली जाईल!’ मुख्यमंत्री निवेदन वाचत होते, आणि ‘एका मयताच्या मृत्यू’ची ही कहाणी ऐकताना अनेकांना हसू आवरत नव्हते..