स्वाइन फ्लूमुळे भायखळा येथील नऊ महिन्यांच्या बालिकेचा गुरुवारी मृत्यू झाला. जुलैमध्ये स्वाइन फ्लूमुळे सात जणांचा मृत्यू झाला असून १९५ रुग्णांची नोंद झाली. स्वाइन फ्लूच्या चाचणीच्या निकालाची वाट न पाहता उपचार सुरू करावेत, अशा सूचना पालिकेच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत. दरम्यान, बदलापूरमध्येही अरुणा रोकडे (३१) या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे समजते.
तापाने फणफणल्यामुळे या बालिकेला २५ जुलै रोजी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ जुलैपासून तिला टॅमी फ्लू देण्यास सुरुवात करण्यात आली. मात्र श्वासोच्छवास यंत्रणेवर परिणाम झाल्याने तिचा ३० जुलै रोजी मृत्यू झाला. तिला इतर कोणतेही आजार नव्हते. स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये होत असलेली वाढ आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. साधा ताप आणि स्वाइन फ्लूचा तापाची लक्षणे साधारण सारखी असल्याने सुरुवातीला ताप वेगळा ओळखणे कठीण असते. मात्र तापाचा जोर वाढला, श्वास घेण्यास त्रास पडत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, दीर्घकालीन आजार असणारे वृद्ध, कर्करोगग्रस्त, एचआयव्ही रुग्ण यांनी अधिक काळजी घ्यावी. ओसेल्टामिव्हीर गोळ्या पालिका तसेच खासगी औषधविक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. स्वाइन फ्लूच्या चाचणीची वाट न पाहता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोळ्या सुरू कराव्यात, असा सल्ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला.
गर्भवतींना लस
गर्भारपणाच्या तिसऱ्या टप्प्यात- सहा ते नऊ महिन्यांच्या गर्भवतींसाठी राज्य आरोग्य विभागाने स्वाइन फ्लूच्या मोफत लस उपलब्ध करून दिल्या आहेत. या लसींमुळे स्वाइन फ्लूविरोधात १५ दिवसात प्रतिकारशक्ती निर्माण होते. ही लस उपयोगी पडण्याचे प्रमाण ७५ टक्के आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात १९ क्रमांकाच्या वॉर्डमध्ये सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत ही लस उपलब्ध आहे. प्रतिसाद पाहून प्रभादेवी, भांडुप व ओशिवरा येथील प्रसुतीगृहांमध्ये ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.