संपूर्ण राज्यात फक्त १३ टक्के पाणीसाठा; जुलैपर्यंत पाणीटंचाईचे भीषण संकट

उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राचे डोळे मान्सूनकडे लागले असले तरी पाणीटंचाईचे नष्टचर्य तातडीने संपण्याची चिन्हे नसल्याने दुष्काळाशी सामना करताना पुढील काही आठवडे संपूर्ण महाराष्ट्र जेरीस येणार असल्याचे चित्र गडद होऊ लागले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाडय़ातील पाणीस्थिती तर दिवसागणिक बिकट होत चालली असून जलाशयांमध्ये केवळ एक टक्का पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या दोन दिवसांतच मराठवाडा अक्षरश: कोरडाठाक पडेल या भीतीने प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

संपूर्ण राज्यातच पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. राज्यातील सर्व जलाशयांमध्ये एकूण साठय़ाच्या १३ टक्के साठा शिल्लक असल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मान्सूनचा पाऊस अपेक्षेनुसार वेळेवर सुरू झाला तरी पुरेसा पाणीसाठा निर्माण होण्यासाठी पुढील काही आठवडय़ांचा कालावधी लागणार असल्याने,  पाणीटंचाईचे चटके किमान जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला सोसावे लागतील, अशी शक्यता सरकारी यंत्रणांनी वर्तविली आहे. सलग चौथ्या वर्षी दुष्काळाला तोंड देणाऱ्या मराठवाडय़ातील जायकवाडी धरणात औरंगाबादला कसाबसा पाणीपुरवठा करता येईल एवढेच पाणी शिल्लक असून, या धरणातील पाण्याची पातळीही झपाटय़ाने खालावत आहे. मराठवाडय़ाच्या ग्रामीण भागात तर पाण्यासाठी अक्षरश: वणवण सुरू असून, आठ हजार ५२२ गावांना पाणीटंचाईने ग्रासले आहे. साडेतीन हजारांहून अधिक टँकर्स पाणीपुरवठय़ासाठी गावोगाव तैनात करण्यात आले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडकसागर तलावात जेमतेम १२ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. पुणे विभागातील जलाशयांमध्येही केवळ १२ टक्के साठा शिल्लक असलेले हे जलाशयही झपाटय़ाने कोरडे होऊ लागले आहेत.

राज्यातील जलाशयांमधील पाण्याचा विभागनिहाय साठा पुढीलप्रमाणे – कोकण (३८ टक्के), मराठवाडा (एक टक्का), नागपूर (२१ टक्के), अमरावती (१४ टक्के), नाशिक (१३ टक्के), पुणे (१२ टक्के) साठा शिल्लक आहे. दर आठवडय़ाला सरासरी एक टक्के साठा कमी होत असून, पाऊस लांबल्यास पाण्याचे नियोजन करणे अधिकच कठीण जाऊ शकते.

पाणी भरताना पडल्याने गर्भवतीचा मृत्यू

जळगाव : पिंप्राळा शिवारातील खंडेराव नगरमील २४ वर्षांच्या गरोदर महिलेचा पिण्याचे पाणी भरत असतांना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. िपप्राळा शिवारातील खंडेराव नगरमधील सिमा चरण पवार सकाळी नऊच्या सुमारास नळाला पिण्याचे पाणी आल्याने भरण्यासाठी बाहेर निघाल्या. अंगणातील कुंडाजवळ पाय घसरल्याने कंबरेला मार बसला. सिमा या सहा महिन्याच्या गरोदर होत्या. नातेवाईकांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

धरणांमधील साठा

भातसा (३६ टक्के), मध्य वैतरणा (३९ टक्के), कोयना (१६ टक्के), बारवी (२२ टक्के), मुंबईला पाणीपुरवठा करमोडक सागर (१२ टक्के), तानसा (२८ टक्के), विहार (१८ टक्के), तुळशी (३८ टक्के).

मराठवाडय़ातील धरणांत फक्त एक टक्का जलसाठा आहे. आम्ही भूजलसाठाही वापरत आहोत. प्रशासन जायकवाडी धरणातून औरंगाबादला जुलैअखेपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवणार आहे.

– उमाकांत दांगट, औरंगाबाद विभागीय आयुक्त