सुरुंग स्फोटांच्या मदतीने समुद्रातील तेलाच्या साठय़ाचा शोध घेण्याच्या पद्धतीचा मच्छिमारांनी विरोध केला आहे. ओएनजीसीने जानेवारीपासून सुरू केलेल्या या स्फोटांमुळे मासे मृत होत असून अनेक थव्यांनी दिशा बदलल्याने मासेमारीवर संक्रात आल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केला.
तेलविहिरींचा शोध घेण्यासाठी एअर गनमधून सॉनिक लहरी समुद्राच्या तळाशी सोडल्या जातात. याचा आवाज प्रचंड मोठा असल्याने अनेक माशांचे थवे मृतावस्थेत समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसतात. अशा पद्धतीने तेलाचा शोध घेण्याची साइस्मिक पद्धतीवर जगात बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईच्या समुद्रात ही पद्धत अजून सुरू असून त्याचा मच्छिमारीवर विपरीत परिणाम होत आहे, असा आरोप कृती समितीने केला आहे.

ओएनजीसी तेलविहिरींतून हजारो कोटी रुपयांचा नफा कमवत असताना आधीच हलाखीची स्थिती असलेल्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येत आहे, त्यामुळे ओएनजीसीने ५०० कोटी रुपयांची भरपाई द्यावी.
– दामोदर तांडेल, अध्यक्ष, मच्छिमार कृती समिती