मंत्र्यांच्या उत्तरावर नापसंती, विरोधकांचा सभात्याग

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन गेले तीन आठवडे विधिमंडळात सत्ताधारी पक्षांना धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षांनी कांद्याच्या अनुदानावरुनही बुधवारी विधान परिषदेत सरकारवर हल्लाबोल केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत मंत्र्यांकडून ठोस आश्वासन दिले जात नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अन्य विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव जाधव यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक संकटाच्या संदर्भात अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे कांद्याचे उत्पादन वाढले आहे. मात्र बाजारात दोन ते तीन रुपये किलो दराने कांदा विकण्याची वेळ आल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याने नाशिक जिल्ह्य़ातील नगरसूल येथील एका अस्वस्थ शेतकऱ्यांने आपल्या पाच एकर कांदा पिकाला आग लावली. गेल्या जुलैमध्ये कांद्याचे भाव खाली आल्यामुळे प्रति क्विंटल शंभर रुपये जाहीर केलेले अनुदानही अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. एका किलोमागे एक रुपया अनुदान देणे, म्हणजे शेतकऱ्यांची ही चेष्टा आहे. किमान किलोमागे पाच रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी या प्रस्तावावरील चर्चेच्यावेळी विरोधी पक्षनते धनंजय मुंडे यांनी केली.

सुरुवातीला पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी या चर्चेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कांद्याला हमी भाव देण्याचा विषय केंद्राच्या अखत्यारित आहे. राज्य सरकार फक्त त्यासाठी शिफारस करु शकते. शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीसाठी चाळी बांधणे व अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध देण्यावर सरकारचा भर आहे. आपल्या राज्यातील कांदा अन्य राज्यांत पाठविण्यासाठी प्रवासी रेल्वेला राष्ट्रीय किसान बाजार या नावाने एक अतिरिक्त डबा जोडण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. या आधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाचे ४३ कोटी रुपयांचे  लवकरच वितरण केले जाईल, अशी माहिती खोत यांनी दिली. मात्र कांद्याला वाढीव अनुदान देण्याच्या मागणीबाबत त्यांनी काहीच आश्वासन न दिल्याने विरोधी पक्षांनी त्यांना धारेवर धरले.  त्यानंतर पणन विभागाचे कॅबिनेट मंत्री सुभाष देशमुख यांनी, अनुदानाबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला जाईल, असे उत्तर दिले. त्याला काँग्रेसचे नारायण राणे यांनी हरकत घेतली. सरकार म्हणून ठोस आश्वासन दिले पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली. मात्र मंत्र्यांचे पुन्हा तेच उत्तर आल्याने त्यावर असमाधान व्यक्त करीत व सरकारचा निषेध करीत विरोधी सदस्यांनी सभात्याग केला.

आवक वाढल्याने भाव गडगडले

नवी मुंबई : राज्यात नाशिकसह गुजरात, दक्षिण भारत, उत्तर भारत आणि मध्य प्रदेशातील काही भागांत यंदा झालेल्या कांद्याच्या विक्रमी उत्पादनामुळे तुर्भे येथील घाऊक बाजारात गेले काही दिवस कांद्याची आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्याचा परिणाम कांद्याचे भाव कमी झाले असून घाऊक बाजारात कांदा चार ते सहा रुपये प्रती किलोने विकला जात आहे. हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास कांदा व्यापाऱ्याला यंदा कांदा चांगलाच रडवणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

गेल्या वर्षी देशातील अनेक भागांत चांगला पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. त्यात मागील काही वर्षांपासून दुष्काळग्रस्त भागातील ऊस उत्पादकांनी कांद्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात लावण्यात आलेल्या कांद्याचे उत्पादन सध्या बाजारात येत असून जुन्या व नवीन कांद्याची आवक वाढली आहे. सध्या येणारा कांदा हा साठवणुकीतील कांदा आहे. देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक, तामिळनाडू अशा तेरा राज्यांत कांद्याचे उत्पादन झाले आहे. देशाला २२ ते २५ लाख क्विटंल टन कांद्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राची यापूर्वी कांदा पुरवठय़ात एक प्रकारची मक्तेदारी होती, मात्र देशातील कांद्याचे उत्पादन वाढल्याने निर्यात आणि त्या त्या राज्यातील कांद्याची गरज हे राज्य पूर्ण करीत आहेत. त्यात पाकिस्तानसारख्या देशातून कांदा निर्यात करून त्याची विक्री करणे परवडणारे असल्याने काही व्यापारी त्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे राज्याच्या काही भागांतून येणाऱ्या कांद्याची आवक वाढली असून दोन दिवसांपूर्वी ही आवक १८० गाडय़ांच्या वर गेली होती. लागोपाठ येणाऱ्या सुटय़ांमुळे ही आवक वाढल्याचे सांगितले जात असले तरी उत्पादन जास्त आणि उठाव कमी असल्याने कांद्याचे दर यापेक्षा जास्त प्रमाणात गडगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील कांदा पार दिल्लीपर्यंत विकला जात होता. निर्यातीलाही चांगले दिवस होते. आता चित्र बदलू लागले असून मागील वर्षी झालेल्या दमदार पावसाने कांद्याचे उत्पादन वाढविले असून आवक वाढली आहे. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांना यंदा रडविणार असे चित्र आहे.    – अशोक वाळुंज, माजी संचालक, एपीएमसी, कांदा बाजार, नवी मुंबई</strong>