राज्य सरकारने शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा दिला आहे. सरकारने कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत ७ दिवसांची वाढ केली असून येत्या २२ सप्टेंबरपर्यंत हे अर्ज भरता येणार असल्याचे जाहीर केले आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मुदतवाढीची माहिती दिली. सरकारच्या नियोजनानुसार ऑनलाइन अर्ज भरण्याची शुक्रवारी (दि. १५) अंतिम मुदत होती. परंतु, तांत्रिक अडचणी व अर्ज भरण्यात येत असलेल्या त्रासामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीचा अर्ज भरू शकले नव्हते. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आणखी काही वेळ मिळणार आहे.

शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीत आपले ऑनलाइन अर्ज भरावेत. या अर्जांची त्वरीत छाननी करून दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या हाती पैसे देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे देशमुख यांनी सांगितले. मुदतवाढीमुळे नियोजनावर थोडा परिणाम होईल. पण सरकारच्या विविध विभागांकडून यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अर्ज भरण्याच्या जटिलतेमुळे अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अर्ज दाखल करता आलेले नाहीत. अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड नाकारले गेले आहेत. अनेकांकडे आधार कार्ड नाहीत. अनेक शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटत नाहीत. आधार कार्डमधील चुका दुरुस्त होण्यास वेळ लागत असल्याने मुदतीत अर्ज भरण्यास अडचणी येत होत्या. सव्‍‌र्हर डाऊन असल्यानेही अर्ज भरताना अडचणी येत आहेत.