डॉक्टरांच्या सल्लापत्राशिवाय औषधविक्री करणे स्नॅपडील या ई-व्यापार संकेतस्थळाला चांगलेच भोवले आहे. या विक्रीविरोधात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल बहल आणि संचालकांविरोधात ‘अन्न आणि औषध प्रशासन’ विभागाने (एफडीए) पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
स्नॅपडील डॉट कॉम या संकेतस्थळावरून औषधांची विक्री होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यावर विभागाने तातडीने त्यावर कारवाई करून संकेतस्थळाला ही विक्री बंद करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणाचा तपास केल्यावर डॉक्टरांच्या सल्लापत्राशिवाय मिळण्यास कठीण अशा ४५ औषधांची विक्री या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्रास होत असल्याचे समोर आले. यामध्ये कफ सिरप, वायग्रासारख्या औषधांबरोबरच आयपीलसारख्या गर्भनिरोधक गोळ्यांचाही समावेश होता. या प्रकरणात भारतातील विविध भागांतील १५० औषध विक्रेत्यांची नावेही समोर आली. यामध्ये प्रामुख्याने दिल्ली, राजस्थानमधील औषध विक्रेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील एकाही औषध विक्रेत्याचे नाव यादीत नसल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आयुर्वेदिक औषधांबाबत तक्रार दाखल करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ग्राहक आणि विक्रेता यांच्यादम्यान आपण केवळ मध्यस्थाची भूमिका साकारत असल्याने आपला संबंध नसल्याचा दावा स्नॅपडीलकडून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आला असला, तरी या प्रकरणात मध्यस्थाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे कांबळे म्हणाले. लवकरच अन्य ई-व्यापार संकेतस्थळांवरून होणाऱ्या औषधविक्रीबाबतही कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत संकेतस्थळामार्फत किती औषधांची विक्री केली गेली आहे, याचा नेमका आकडा कळण्यासाठी विभागाने कंपनीकडून तशी माहिती मागविली आहे. ऑनलाइन औषधविक्री हा भारतात गुन्हा नसला, तरी त्याची परवानगी मात्र कोणालाही देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

आम्ही वेळोवेळी विक्रेत्यांकडून योग्य वस्तूंची विक्री होईल याची काळजी घेतो, पण कित्येकदा विक्रेत्यांकडून अशा चुका होतात; पण अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नोटीस मिळाल्यावर लगेचच या औषधांची यादी संकेतस्थळावरून काढण्यात आली असून यापुढेही विभागाला आवश्यक ती सर्व माहिती पुरविण्यात संपूर्ण साहाय्य करण्यात येईल.
– स्नॅपडीलचे प्रवक्ते