आयआरसीटीसी सेवा सुरू; साधारण श्रेणीतही उपलब्ध

लांब पल्ल्याच्या गाडय़ांनी प्रवास करताना शयनयान श्रेणीतील प्रवाशांना आपले अंथरूण-पांघरूण बरोबर बाळगावे लागते. आता प्रवाशांची ही अडचण दूर करण्यासाठी आयआरसीटीसीने अंथरूण-पांघरूण यांचेही ऑनलाइन आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून अंथरूण-पांघरूणाची विक्री होणार असून शयनयान श्रेणीप्रमाणे साधारण श्रेणीतील प्रवाशांसाठीही ती उपलब्ध असतील. मात्र, त्यासाठी प्रवाशांकडे तिकीट असणे आवश्यक आहे. ही सुविधा बुधवारपासून मुंबई सेंट्रल आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांवर सुरू झाली आहे.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये वातानुकुलित श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चादरी, ब्लँकेट आणि उशी प्रवासादरम्यान दिली जाते. पण शयनयान श्रेणी वा साधारण श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपापल्या घरून अंथरूण-पांघरूण आणावे लागते. या प्रवाशांसाठीही प्रवासादरम्यान ‘बेडिंग’ उपलब्ध व्हावे, यासाठी आयआरसीटीसीने ई-बेडरोल’ सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांना दोन बेडशीट आणि एक उशी यांच्यासाठी १४० रुपये आणि एका ब्लँकेटसाठी ११० रुपये मोजावे लागतील.  ही सुविधा नवी दिल्ली, चेन्नई, त्रिवेंद्रम, हजरत निजामुद्दीन या स्थानकांवर याआधीच सुरू झाली असून आता बुधवार, २४ ऑगस्टपासून मुंबईतील दोन स्थानकांवर सुरू करण्यात आली.

‘ई-बेडरोल’ची सुविधा मिळवण्यासाठी शयनयान श्रेणीचे आरक्षण असलेल्या प्रवाशांना आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर जाऊन प्रवाशांना योग्य पीएनआर क्रमांक टाकून आरक्षण करावे

लागेल. त्यानंतर प्रवाशांना बेडरोल आरक्षित झाल्याची चिठी मिळेल. प्रवासी आपल्या आसनावर गेल्यानंतर त्याला हे बेडरोल देण्यात येईल.

तर साधारण श्रेणीचे तिकीट काढलेल्या प्रवाशांना मुंबई सेंट्रल येथे फूड कोर्टजवळ आणि सीएसटी येथे नीलम फूड प्लाझा येथे आपले तिकीट दाखवून हे अंथरूण-पांघरूण विकत घेता येणार आहे. प्रवासानंतर प्रवासी हे अंथरूण-पांघरूण आपल्यासह घरी घेऊन जाऊ शकतात.

मुंबई सेंट्रल आणि सीएसटी येथे सुविधा

सध्या मुंबईतील दोन स्थानकांवर ही सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद बघून इतर स्थानकांवरही ही सुविधा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे गट महाव्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी सांगितले.