मुंबईत रस्ता, पदपथावर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या तब्बल ७३८ पैकी केवळ १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी पालिकेकडून परवानगी मिळाली आहे. तब्बल ६० गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. तर स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाकडून आवश्यक असलेले ‘ना हरकत’  प्रमाणपत्र मिळू न शकल्याने ५८० मंडळांच्या मंडपाला अद्याप परवानगी मिळू शकलेली नाही.

दहीहंडी उत्सव पार पडल्यानंतर आता मुंबईमध्ये गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते रात्र जागवून सजावट करण्यात गुंतले आहेत. एकूणच गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज होऊ लागली आहे. मुंबईमधील तब्बल ७३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारणीसाठी परवानगी मिळावी यासाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत. परंतु यापैकी केवळ १७ मंडळांना मंडप उभारणीची परवानगी पालिकेने दिली आहे. तर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आणि पालिकेचे निकष पूर्ण करू न शकलेल्या तब्बल ६० मंडळांना मंडप उभारणीची परवानगी नाकारण्यात आली आहे.

मंडप उभारणीसाठी स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. ७३८ पैकी ५८० मंडळांना या तिन्ही यंत्रणांकडून अद्याप ‘ना  हरकत’ प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. त्यामुळे ही मंडळे मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. गणेशोत्सव अवघ्या नऊ दिवसांवर आला असताना अद्याप मंडप उभारणीसाठी परवानगी मिळू न शकल्याने गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. आयत्या वेळी परवानगी नाकारली तर काय करायचे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

९३ मूर्तिकारांचे अर्ज फेटाळले

पादचारी आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या २८६ पैकी ९३ मूर्तिकारांना मंडप उभारण्यास पालिकेकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मंडप उभारणीसाठी १०४ मूर्तिकारांना परवानगी देण्यात आली असली तरी अद्याप ८१ मूर्तिकारांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार आखलेल्या धोरणाच्या आधारे रस्त्यांमध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडळांना परवानगी द्यावी. वाहतुकीला अडथळा येणार नाही याची हमी मंडळांकडून देण्यात येईल. परवानगी नाकारलेल्या मंडळांच्या अर्जाचा पालिकेने फेरविचार करावा.   – अ‍ॅड. नरेश दहिबावकर, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती