सवलतीच्या दरात कलाकारांना आपल्या कलेचे सादरीकरण करता यावे यासाठी मुंबईतील काळा घोडा परिसरात ‘खुले’ कलादालन उपलब्ध करण्यात आले आहे.

होतकरू कलाकारांना मुंबईतील   कलादालनाचे भाडे आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही. महापालिकेच्या ‘अ’ विभागातर्फे हे कलादालन  कलाकारांना दर रविवारी के. दुभाष मार्गावर  उपलब्ध करण्यात येईल. यात कलाकारांना आपल्या कलाकृतीचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल. त्यासाठी केवळ ४०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.  या कलामेळ्याला कलाकारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती ‘अ’ विभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना दिली.    सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत कलाकार आपल्या कलाकृती प्रदर्शनासाठी ठेवू शकतात. यासाठी दर रविवारी ९ ते ७ या वेळेत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे. येथील पदपथावर २१ दालनांची निर्मिती करून ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या अटीवर कलाकारांसाठी हा कलामेळा भरविला जाईल.

संगीतमय कार्यक्रमांवर मर्यादा

काळा घोडा हा शांतता क्षेत्र असल्याने इथे ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे नृत्य कलाकार आणि गायक, संगीतकार यांना कलेचे सादरीकरण करण्यात बंधने आली आहेत.