विरोधक आक्रमक; कट करून बँकांची फसवणूक केल्याचा ठपका     

कामगारमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभय दिले असले तरी, कर्जाची रक्कम अन्य कारणासाठी वापरून निलंगेकर यांनी कट करीत बँकांची फसवणूक केल्याचे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सादर केलेल्या प्राथमिक माहिती अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने गुरुवारी केला. भाजपला अडचणीत आणण्याकरिता काँग्रेसने कलंकित मंत्र्यांचा मुद्दा लावून धरला आहे.

तरुण आणि शिकल्या सवरलेल्या संभाजी निलंगेकर यांना नाहक बदनाम करू नका. त्यांनी काहीच चुकीचे केलेले नाही, असे गेल्याच आठवडय़ात कलंकित मंत्र्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले होते. लातूर पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये सीबीआयने सादर केलेली कागदपत्रे तसेच बँकांचा पत्रव्यवहार ही सारी कागदपत्रे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उघड करून निलंगेकर स्वच्छ कसे, असा सवाल उपस्थित केला. विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत निलंगेकर यांच्या विरोधात नव्याने प्राप्त झालेला पुरावा सादर करण्यास भाजपच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. तरीही विखे-पाटील यांनी हा विषय सभागृहात उपस्थित केला तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यावर प्रकाश टाकला.

संभाजी निलंगेकर यांच्या मेव्हण्याच्या कंपनीसाठी घेण्यात आलेल्या ४९ कोटींच्या कर्जाला स्वत: निलंगेकर हे जामीनदार आहेत. बँकांकडून कर्जाच्या रुपाने मिळालेली रक्कम कटकारस्थान करून इतरत्र वापरण्यात आली. परिणामी कर्जाचा हेतू साध्य झाला नाही व या रकमेतून मालमत्ता उभी राहिली नाही, असे सीबीआयच्या कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे याकडे विखे-पाटील यांनी लक्ष वेधले.