विरोधकांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

फसवणुकीच्या आरोपांवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केलेले संभाजी निलंगेकर-पाटील हे स्वच्छ कसे, असा सवाल विरोधकांनी केला आहे. कलंकित मंत्र्यांवरील आरोपांवरून सरकारने पळ काढल्याचा आरोपही करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्र्यांवरील आरोपांवरून बचावात्मक भूमिका घ्यावी लागली, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केला. उत्तरानंतर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे मुख्यमंत्र्यांनी टाळले. यावरूनच सरकारने पळ काढल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही चव्हाण व पाटील यांनी केली. संभाजी निलंगेकर-पाटील यांच्याविरुद्ध सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आजोबा शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांच्या मालकीच्या जमिनीवर संभाजी यांनी मालकी हक्क प्रस्थापित केला आहे. ज्या मंत्र्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल होतो तो न्यायालयीन निवाडा होण्यापूर्वीच स्वच्छ कसा, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला भाजपच्या दृष्टीने स्वच्छ आणि पारदर्शक आहे का, असा सवालही विरोधकांनी केला.

रवींद्र चव्हाण यांना आपण गृहमंत्री असताना रिव्हॉल्व्हरचा परवाना दिला होता हे जरी सत्य असले तरी त्यांच्या विरोधात दाखल झालेले गुन्हे हे त्यानंतरच्या काळातील आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला. गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दलित वर्गात भाजपबद्दल प्रचंड असंतोष आहे. सध्या गुजरातमध्ये दलित समाजाने सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. डोंबिवलीतील कार्यक्रमात दलित समाजाच्या विरोधात अनुद्गार काढणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना राज्यमंत्रिपदाची बक्षिसी देऊन महाराष्ट्रातही भाजप दलित समाजाच्या विरोधात असल्याचा संदेश गेल्याची टीका चव्हाण यांनी केली. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे नाव घेतले, पण कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे नाव मुख्यमंत्र्यांनी का घेतले नाही, असा सवालही विरोधकांनी केला.

‘..तरीही वायकरांना अभय

आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या व्यायामशाळेच्या जागेत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. ‘आरे’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने हे मजल्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, असे पत्रच लिहिले आहे. तरीही वायकर यांना मुख्यमंत्र्यांनी कसे अभय दिले, असा सवालही चव्हाण आणि पाटील यांनी केला.