गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर मराठवाडय़ात माझे नेतृत्व उभे राहत आहे. त्यांच्याइतकी माझी योग्यता नसली तरी त्यांची मुलगी असल्याने लोकांचे माझ्यावर प्रेम आहे. हे सहन होत नसल्याने आपल्यावर लांच्छनास्पद आरोप करून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.
बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे दिले आणि सिद्ध केले, तर मी राजीनामा देईन, असे त्यांनी स्पष्ट केले. मी फार लवकर कमावले आणि गमावले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. मुंडे यांच्यावरील आरोपसत्रामागे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे असल्याचे त्यांनी सूचित केले असून ही लढाई ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ अशी आहे.
वडिलांच्या निधनानंतर मी एकाकीपणे लढा देत आहे. मला जनतेचा पाठिंबा असून पक्ष, सहकारी मंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस हेही माझ्याबरोबर आहेत. त्यांनी आपल्यावरील आरोपांचे सविस्तरपणे खंडन केले, असे सांगून, माझा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांच्या आरोपांची विश्वासार्हता किती आहे, असा सवालही त्यांनी केला. मी पैसे कमवायला राजकारणात आलेले नाही आणि लहान मुलांच्या वाटपासाठी असलेल्या चिक्कीसारख्या प्रकरणात एक रुपयाचाही गैरव्यवहार नाही. मला असल्या गोष्टींमधून पैसे मिळविण्याची गरजही नाही. माझी सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. आधीच्या सरकारने केलेल्या दर करारानुसार त्यांनी केलेली ४०८ कोटी रुपयांची खरेदी योग्य आणि मी केलेली खरेदी म्हणजे गैरव्यवहार असा रंग देणे योग्य नाही. राजकीय हेतूंनी मला बदनाम करण्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्र सरकारचा निधी परत जाऊ नये, यासाठी चिक्कीची खरेदी झाली. कोणत्याही व्यक्तीला फायदा व्हावा, यासाठी मी निर्णय घेतलेला नाही, असे पंकजा यांनी नमूद केले. ई निविदांचा निर्णय सरकारने घेतला असला तरी दर करार पद्धती रद्द करण्यात आलेली नाही. दर करार पद्धती कागदोपत्री असते व ई पद्धती संगणकीय असते, एवढाच फरक असून दर करार पद्धतीने खरेदी करण्याच्या निर्णयाचे त्यांनी समर्थन केले. जलयुक्त शिवार योजनेत अपात्र ठरविलेल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी मी कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. माझ्याकडे तक्रार आल्यावर शासनाचे पैसे वाचवावेत, यासाठी ‘उचित कार्यवाही करावी’ एवढय़ाच सूचना आपण दिल्या. धनंजय मुंडे, आमदार मधुसूदन केंद्रे आणि अन्य मंडळींच्या वादातून माझ्यावर हस्तक्षेपाचे आरोप झाले.  शिवार योजनेत कंत्राट देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच असून मी माझ्या मतदारसंघातही अमुक व्यक्तीला काम द्यावे, अशी शिफारस केली नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.
*चिक्की उत्तम असल्याचे तीन प्रयोगशाळांमध्ये सिद्ध
*खराब चिक्की पुरविली असल्यास चौकशी
*महिला बचत गटांना काम देण्यात तांत्रिक अडचणी
*लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीला उत्तरे

पंकजा मुंडे पक्षात एकाकी?
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावरील आरोप खोडून काढण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पण पंकजा मुंडे यांनी एकटय़ानेच आपला बचाव केला.
केंद्रीय नेतृत्व आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मुनगंटीवार यांच्यावर मंत्रिमंडळ आणि सरकारचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुनगंटीवार हे पत्रकार परिषदेला हजर राहणार, असे त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात दाखविण्यात आले होते. पण मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील आपल्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने आले नाहीत, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. मात्र पत्रकार परिषद अंतिम टप्प्यात असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता घाईघाईने पत्रकार परिषदेस आले.