भाववाढ कमी करून स्वस्ताई आणण्याचे आश्वासन निवडणुकीत भाजपने दिले होते. स्वस्ताईच्या या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल भाजप आणि शिवसेनेला करीत काँग्रेसने ‘बेस्ट’ची दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे.  ‘बेस्ट’च्या बससेवेच्या भाडय़ात एक ते दहा रुपयांची वाढ रविवारपासून अमलात आली. ‘बेस्ट’च्या भाडय़ात वाढ करून भाजप आणि शिवसेनेने सामान्य प्रवाशांवर बोजा टाकल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. भाडेवाढीच्या निषेधार्थ मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी आंदोलन करण्यात येणार आहे. ही भाडेवाढ मागे घ्यावी, अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.