भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सरकारची कोंडी; विधान परिषदेचे कामकाज ठप्प

आम्ही कोणताही भ्रष्टाचार केलेला नसून कोणत्याही निर्णयात एक रूपयाचा जरी गैरव्यवहार आढळून आला तर मंत्रीपदच काय राजकारणातूनही सन्यास घेऊ. मात्र ठोस पुरावे न देता केवळ भ्रष्टाचारी म्हणून कोणाचे आयुष्यही उध्वस्त करू नका, असे भावनीक आर्जव कथित भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी सोमवारी विधान परिषदेत विरोधकांना केले. मात्र त्यानंतरही या मंत्र्यांची न्यायालयीन अथवा एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याच्या मुद्यावर विरोधक अडून बसल्याने विधान परिषदेत सरकारची कोंडी झाली. परिणामी दोन वेळा कामकाज तहकूब करूनही कोंडी फूटू न शकल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

मंत्र्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या चर्चेवरून आज परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. भ्रष्टाचाराबाबत सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. केवळ आरोप झाले म्हणून एकनाथ खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा घेण्यासही सरकार आणि पक्षाने मागेपुढे पाहिले नाही. पण केवळ काहीतरी आरोप करायचे म्हणून आरोप करतांना कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याचीही विरोधकांनी खबरदारी घ्यावी असे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी सुनावले.

पुरवठादार, ठेकेदाराच्या संघर्षांतून हे आरोप होत असून त्याचे बळी मात्र मंत्री ठरताहेत. चर्चेनंतर सभागृहात प्रश्न संपत असला तरी त्याच्या जखमा दिर्घकाळ राहतात. आपण सत्तेत असतांनाही अनेक मंत्र्याविरोधात आरोप झाले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एका मंत्र्याचा राजीमाना घेण्या पलिकडे कोणावरही कारवाई केली नाही याची जाणीवही पाटील यांनी विरोधकाना करून दिली.

तत्पूर्वी अनेक मंत्र्यांनी आपल्यावरील आरोपांचा इन्कार केला. आपण एक रूपयाचा जरी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाल्यास केवळ राजकारणच नव्हे तर या जगातून निघून जाऊ, विरोधकांच्या शेतात काम करू, राजकारणातून सन्यास घेऊ असे आव्हान मंत्र्यांनी दिले. मात्र मंत्र्याच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. भ्रष्ट मंत्र्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी लावून धरल्याने कामकाज दोन वेळा तहकूब झाले.

दूध भेसळ अजामीनपात्र करण्याचा प्रस्ताव

मुंबई : अन्नातील भेसळ रोखण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून दूधात भेसळ करणाऱ्यांना किमान वर्षभर तुरूंगात सडविण्यासाठी हा गुन्हा अजामीनपात्र करण्यात येणार आहे.त्यासाठी गृह विभागाला विनंती करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयातही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती अन्न वऔषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यात सर्वत्र दूधात भेसळ केली जात असून मुंबईत तर अशा टोळ्याच कार्यरत असल्याचा आरोप सदस्यांनी केला.

.. तर मुख्यमंत्रीच अडचणीत – धनंजय मुंडे</strong>

डझनाहून अधिक मंत्र्यांचा भ्रष्टाचार पुराव्यांसह मांडला. परंतु सरकारने चौकशी न करता प्रत्येक मंत्र्याला ‘क्लिनचीट’ दिली. चौकशीशिवाय क्लीनचीट देण्याची पद्धत आम्ही यापुढे चालू देणार नाही, भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा झाल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घेतली. आमच्या आरोपांना एकाही मंत्र्यांने उत्तर दिलेले नसून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना ज्या आरोपांवरुन मंत्रिपद सोडावे लागले, त्याहून कितीतरी गंभीर आरोप विद्यमान मंत्र्यांवर आहेत, परंतु त्यांची चौकशी जाहीर करण्यास सरकार घाबरत आहे. या मंत्र्याना वाचवता वाचवता उद्या मुख्यमंत्रीच अडचणीत येण्याची परिस्थिती येऊ शकते असा इशारीही त्यांनी यावेळी दिला.