विरोधकांची टीका; अधिकाधिक भरपाईची मागणी

वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) मुद्दय़ावरून सुरू असलेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागली. वस्तू व सेवा करामुळे राज्याचे सर्वाधिक नुकसान होणार असून उत्तर प्रदेशला या कायद्याचा सर्वात जास्त फायदा होणार असल्याची टीका विरोधकांनी केली. राज्याला सोसाव्या लागणाऱ्या नुकसानाची अधिकाधिक भरपाई कशी मिळेल, याकडे लक्ष देण्याची मागणी माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.

नोटाबंदीचे परिणाम जाणवत असतानाच वस्तू आणि सेवा करामुळे राज्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने राज्यांना देण्यात येणाऱ्या मदतीत ३२ टक्क्य़ांवरून ४२ टक्क्य़ांपर्यंत वाढ केली; पण हे करताना केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा वाटा वाढविला. परिणामी या वाढीचा काहीच उपयोग झालेला नाही. ‘जीएसटी’ची नुकसानभरपाई ४२ टक्के रकमेच्या कक्षेच्या बाहेर राहील या दृष्टीने खबरदारी घेण्याची मागणीही पाटील यांनी या वेळी केली. सध्या राज्याची तिजोरी ही पेट्रोलवरील वाढत्या अधिभाराच्या आधारे भरण्यात येत आहे, कारण वारंवार पेट्रोलवरील अधिभार वाढविण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर राज्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. सातवा वेतन आयोग कधी लागू करणार याचे सरकारकडून काहीच सूतोवाच केले जात नाही. बहुधा या आर्थिक वर्षांत सरकारी कर्मचाऱ्यांची निराशाच होईल, अशी चिन्हे असल्याचेही पाटील म्हणाले. वस्तू व सेवा कर लागू झाल्यावर महागाई वाढेल, अशी भीती व्यक्त करताना त्यांनी, बांधकाम क्षेत्रात तर वाढ होणारच, पण सामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या धोतरांच्या किमती वाढणार आहेत याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले. जिल्हा बँका बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

खडसेंच्या सवालाने सारेच अवाक्

संघर्षयात्रेच्या वेळी जळगावला विरोधी नेते गेले असता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चहापानाला बोलाविले आणि स्वत: उपस्थित होते. आगतस्वागत केले. नाथाभाऊंना विरोधी नेत्यांबद्दल प्रेम आहे. यामुळेच त्यांनी विरोधी नेत्यांचे स्वागत केले, असे सांगत जयंत पाटील यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आपण तेथे उपस्थित होतो हे सांगतानाच खडसे यांनी, ‘कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा’ असे उद्गार काढल्याने सारेच अवाक्  झाले. खडसे यांचा रोख कोणावर होता याचीच मग चर्चा सुरू झाली.

मुख्यमंत्र्यांची कार्यशैली मोदींसारखी!

मुंबई : गेल्याच आठवडय़ात सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका दिवसात तीन ठिकाणी जाऊन तलावातील गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली. आता मुख्यमंत्र्यांनी गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करायची असते का? हे काम संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे आहे, पण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंत्र्यांना फार काही महत्त्व देत नाहीत, त्याच धर्तीवर राज्यातही फडणवीस हे स्वत:च सारा पुढाकार घेत असल्याने मंत्र्यांना कामच उरले नाही, अशी मुख्यमंत्र्यांना जिव्हारी लागणारी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा’ 

संघर्षयात्रेच्या वेळी जळगावला विरोधी नेते गेले असता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चहापानाला बोलाविले. त्यांनी स्वत: उपस्थित राहून विरोधकांचे आगतस्वागत केले. नाथाभाऊंना विरोधी नेत्यांबद्दल प्रेम आहे. यामुळेच त्यांनी विरोधी नेत्यांचे स्वागत केले, असे सांगत जयंत पाटील यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आपण तेथे उपस्थित होतो हे सांगतानाच खडसे यांनी, ‘कटप्पाने बाहुबली को क्यूं मारा’ असे उद्गार काढल्याने सारेच अवाक्  झाले. त्यावरून जोरदार चर्चा सुरू होती.