महापौरांच्या अभिनंदनाच्या आडून
मुंबई : रस्ते विभागातील घोटाळ्याच्या चौकशीची थेट पालिका आयुक्तांना पत्र पाठवून मागणी करणाऱ्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पालिका सभागृहाच्या बैठकीत सादर करून शिवसेनेला शह देण्याच्या हालचाली विरोधी पक्षांनी सुरू केल्या असून भाजपचीही त्याला मूक संमती आहे. त्यामुळे अभिनंदन प्रस्तावावरून येत्या सोमवारी होणारी पालिका सभागृहाची बैठक वादळी होण्याची चिन्हे आहेत. महापौरांच्या या पत्रप्रपंचामुळे शिवसेनेचे नगरसेवकही कमालीचे संतप्त झाले आहेत.

नालेसफाईप्रमाणेच रस्ते बांधणीच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाला असून रस्ते कंत्राटातील रॅबिट वाहून नेण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली आहे. किलोमीटरचा आकडा फुगवून रॅबिट टाकण्यात आलेल्या जागेचे अंतर वाढवून दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात कंत्राटदारांनी २० टक्के रॅबिट वाहून नेले असून ८० टक्के रॅबिट वाहून नेण्याचे काम झालेच नाही, असे महापौरांनी पत्रामध्ये म्हटले आहे. स्नेहल आंबेकर यांनी मोठय़ा धाडसाने रॅबिट वाहून नेण्याच्या कामामध्ये घोटाळा झाल्याचे स्पष्ट करीत थेट आयुक्तांकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे येत्या सोमवारी पालिका सभागृहाच्या बैठकीमध्ये महापौरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

महापौरांचे अभिनंदन करताना रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभे करीत सत्ताधारी शिवसेनेला अडचणीत आणण्याचा डाव काँग्रेसने टाकला आहे. सर्वच विरोधी पक्षांचा त्याला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा विरोधकांचा इरादा आहे. भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी महापौर अभिनंदनास पात्र असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र विरोधकांकडून सादर केल्या जाणाऱ्या या प्रस्तावास सभागृहात थेट पाठिंबा द्यायचा की नाही, असा प्रश्न भाजप नेत्यांना पडला आहे. मात्र असे असले तरी भाजपचा त्याला मूक पाठिंबा असल्याचे समजते.

पत्रफुटीच्या चौकशीची महापौरांची मागणी

रस्त्यामधील घनकचऱ्याच्या कामात घोळ असल्याचे आपण पत्रात म्हटले आहे. रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबद्दल पत्रामध्ये कोणताही उल्लेख नाही. पालिका आयुक्त अजय मेहता यांना पाठविलेले गोपनीय पत्र फुटलेच कसे, प्रथम या प्रकरणाची चौकशी करावी, असे महापौर स्नेहल आंबेकर यांनी गुरुवारी सांगितले.