डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अयशस्वी ठरलेली पोलीस यंत्रणा, बलात्कार, खून, दरोडे, मारहाण, दादागिरी, धमकावण्याच्या घटना आणि गुंडगिरी रोखण्यात पोलीस यंत्रणेला आलेले अपयश यामुळे सत्ताबदलानंतर जेमतेम पाच महिन्यांतच भाजप सरकारवर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. याबद्दलच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीचे पडसाद वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्टपणे उमटल्याने आता पोलिसांची झाडाझडती सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे.
अमली पदार्थाच्या तस्करीतील पोलिसांचा सहभाग, वाळूमाफियांची खुलेआम गुंडगिरी, नगरमधील सामूहिक बलात्कार अशा प्रकरणांमुळे पोलिसांची उरलीसुरली लक्तरेही वेशीवर टांगली गेली आहेत. राज्यात वाळूमाफियांचा धुमाकूळ सुरूच असून अनेक सरकारी अधिकारी त्याला बळी पडत आहेत. नांदगाव तहसीलदार तसेच मंडल अधिकाऱ्याच्या अंगावर ट्रक घालू पाहणाऱ्या किशोर परदेशी व त्याचा मुलगा बंटी यांची हिंमत येवल्यातील प्रांत अधिकारी वासंती माळी तसेच तलाठी प्रतिभा नागलवाड यांना जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत पोहोचली आहे.
मुंबईत पंधरवडय़ात दिवसाढवळ्या एटीएम व्हॅन लुटण्याच्या दोन घटनांनी खळबळ उडवून दिली. शक्ती मिल बलात्कार प्रकरणानंतर सावध झालेल्या पोलिसांना कॉटनग्रीन येथील २१ वर्षांच्या तरुणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे पुन्हा सतर्क केले आहे. आरे वसाहतीत सकाळी दूध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला बळजबरीने रिक्षात घालून तिच्यावर निर्घृण बलात्कार करण्याच्या घटनेमुळे आता रस्त्यावर पोलिसांचे अस्तित्व वाढविण्यात आले आहे. ठाण्यात तर कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसविण्याच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. वर्गणी न दिल्याने व्यापाऱ्यांना मारहाण करण्याच्या प्रकारांची पोलीस ठाण्यात नोंदही होत नाही, असे सांगितले जाते. मटकाकिंग बाळू नाडर याच्या अड्डय़ात घुसून रोकड लुटणाऱ्या सहा पोलिसांना थेट पोलीस ठाण्यात जाऊन मारहाण करण्याची हिंमत नाडरने दाखवून पोलिसांचीच इभ्रत काढली. दिव्यात बांधकाम व्यावसायिक संदीप पाटील याची हत्या करून मारेकऱ्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले.
रायगडात सामाजिक बहिष्काराच्या नावाखाली कुटुंबीयांना मारहाण होणाऱ्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंदही होत नाही. सोलापूर येथे दिवसाढवळ्या दिनेश आहुजा या व्यापाऱ्याला दुकानात घुसून मारहाण करण्यात आली. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतरही गेल्या पाच महिन्यांत कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीत काहीही बदल घडलेला नाही, उलट महाराष्ट्र कुठे चाललाय, असाच सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील मध्यवर्ती तुरुंगातून बराकीचे गज तोडून खतरनाक गुंड पळून जातात, तुरुंग अधीक्षकाच्या कार्यालयात कैद्यांच्या वाढदिवसांच्या पाटर्य़ा झोडल्या जातात, हे कमी की काय म्हणून नगर जिल्ह्य़ात एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला जातो, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले आहेत, मुख्यमंत्र्यांचा वचक राहिलेला नाही, त्यामुळे त्यांनी गृहखाते सोडावे, अशा जोरदार शब्दांत विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला.
मुख्यमंत्र्यांनी आव्हान स्वीकारले
गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे गुन्हेगारीचे मोठे आव्हान पुन्हा राज्यासमोर उभे राहिले आहे. या प्रवृत्तीना काही दिवसांतच ठेचून काढू. हे आव्हान मी स्वीकारले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा-सुव्यवस्थेची घडी बसविण्याचा निर्धार विधान परिषदेत व्यक्त केला. राज्यात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.