विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विरोधकांनी ऊसप्रश्नी आक्रमक भूमिका घेत सरकारवर हल्लाबोल केला. एफआरपीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ उडाल्याने दिवसभरात तब्बल पाचवेळा विधानसभेचे कामकाज थांबवावे लागले. अखेर सरकारच्या उत्तरावरून विरोधकांचे समाधान न झाल्याने विधानसभा अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. राज्यातील ऊस उत्पादक शेतक-यांना अद्याप एफआरपीनुसार भाव मिळाला नसल्याच्या मुद्द्यावरून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले. राज्यातील ऊस कारखाने बंड पडायला लागले असून फडणवीस सरकारने अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यावेळी म्हणाले.
तर, राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून विधानसभेत आम्हाला चर्चा करायची होती मात्र, या मुद्द्यांवरून विरोधक आपल्याला कोंडीत पकडणार या जाणीवेतून मुद्दाम सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. आपलेच आमदार गोंधळ घालत असताना राज्याचे मुख्यमंत्री मात्र मूग गिळून गप्प बसले होते. असा प्रकार इतिहासात पहिल्यांदाच विधानभवनात घडल्याचेही आव्हाड पुढे म्हणाले.
दरम्यान, उस उत्पादकांना एफआरपीनुसार दर मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून उत्पादन जास्त होत असल्याने दर कमी मिळत असल्याचे स्पष्टीकरण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. तसेच ऊस उत्पादकांना आता मळी राज्य आणि देशाबाहेर पाठवता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने फायदा होईल असेही ते पुढे म्हणाले.