ठाणे स्थानकानजिकच्या सॅटीस परिसरातील बेकायदा पार्किंग आणि अतिक्रमणे हटविण्यासाठी मंगळवारी सकाळी महापालिकेचे नवे आयुक्त संजीव जैयस्वाल यांनी अचानकपणे दौरा केला.
या दौऱ्यात आयुक्त जैयस्वाल यांनी सॅटीसची पाहाणी करत या परिसरातील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सॅटीस परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्या नाहीतर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला.
रेल्वेच्या एका अहवालानुसार, ठाणे स्थानक परिसरातून दररोज सुमारे सात लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, स्थानकातील सॅटीस परिसरातील बेकायदा वाहन पार्किंग आणि फेरीवाल्यांमुळे नागरिकांना प्रवासदरम्यान अनेक अडचणीचा सामाना करावा लागतो.
या पाश्र्वभूमीवर आयुक्त जैयस्वाल यांनी मंगळवारी सकाळी संबंधित अधिकाऱ्यांना सॅटीस पुलावर   बोलावून घेतले.
सॅटीस पुलाची पाहाणी करत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बस नियोजनाचे आदेश
आयुक्त जैयस्वाल यांनी ठाणे परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले. त्यामध्ये नागरिकांना बस गाडय़ांसाठी जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, अशा पद्धतीने बसगाडय़ांच्या वेळापत्रकाचे नियोजन करावे. तसेच बस स्थानकाचे नामफलक व्यवस्थित बनवून लावावेत, आदीचा समावेश होता.