राज्यभर मंगळवारी महाअवयवदान अभियानाद्वारे जनजागृती
मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे देशभरात पाच लाख रुग्णांना मूत्रपिंडांची आवश्यकता आहे तर ५० हजार रुग्णांना यकृत रोपणामुळे जीवनदान मिळणार आहे. ब्रेनडेड व्यक्तीचे अवयव अशा रुग्णांना संजीवनी देऊ शकतात. परंतु जागृती नसल्यामुळे अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. अवयवदानाबाबत राज्य शासनामार्फत महाअवयवदान जनजागृती अभियान ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान राबविले जाणार आहे. इतकेच नव्हे तर यापुढे अवयवदानही ऑनलाइन करणे शक्य होणार आहे.
मुंबईत यानिमित्त मंगळवारी नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारतीजवळ राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गिरीश महाजन तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीतीत सकाळी साडेसात वाजता वॉकेथॉनला हिरवा कंदील दाखविला जाणार आहे.
शासकीय, निमशासकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, विद्यार्थी तसेच विविध संघटना या वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन अवयवदानाबाबत जागृती करणार आहेत. या वॉकेथॉनचा समारोप मरीन ड्राइव्ह येथील जिमखाना मैदानात होणार आहे.
मुंबईतील वॉकेथॉनची जबाबदारी सांभाळणारे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले की, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ मध्ये आल्यानंतर आतापर्यंत ११ हजार ३६४ मूत्रपिंडे, ४६८ यकृते, फक्त १९ हृदये तर तीन फुफ्फुसांचेस प्रत्यारोपण करून रुग्णांना नवजीवन देण्यात आले. दरवर्षी ४०० ते ५०० इतकी नेत्रबुबुळे दृष्टिहीनांना दृष्टी प्राप्त करून देतात. देशभरात पाच लाख मूत्रपिंडे, ५० हजार यकृते तसेच दोन हजारांहून अधिक हृदये रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अवयवदानाबाबत मोठय़ा प्रमाणात जगजागृती निर्माण होण्यासाठीच या अभियानाची आवश्यकता आहे. http://www.dmer.org/ या संकेतस्थळावर इच्छुकाला अवयदानासाठी नोंदणी करता येणार आहे. ब्रेनडेड रुग्णांमधील अवयवदानाबाबत जोरदार जागृती निर्माण करण्याची गरजही डॉ. लहाने यांनी बोलून दाखविली.