शिवसेनेचा विरोध असला तरी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाचा नियोजित कार्यक्रम होणारच, असे ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी सकाळी स्पष्ट केले. काही अज्ञात व्यक्तींनी सोमवारी सकाळी सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर काळी शाई फेकली. त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोणी कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तरी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणारच, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
ते म्हणाले, पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा आम्ही निषेधच करतो. दहशतवाद्याच्या मुद्दयावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. मात्र, त्याचा अर्थ त्या देशातील लोकांनी इथे येऊ नये आणि आपल्या लोकांनी तिथे जाऊ नये, असा होत नाही. दोन्ही देशातील सामान्यांचे संबंध सुरळीत राहिलेच पाहिजेत. माझ्यावर हल्ला करणारे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. त्यांनी माझ्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि कार्यक्रम रद्द करण्यासाठी धमकीही दिली. मात्र, आम्ही घाबरणार नाही. ठरल्याप्रमाणे नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रम होईल.
हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने आधीच दिला होता. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या विरोधामुळे ज्येष्ठ पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम आयोजकांकडून रद्द करण्यात आला होता. त्यामुळे कसुरी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचीही तीच गत होणार का?, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाला असणारा शिवसेनेचा विरोध मागे घ्यावा, यासाठी काल सुधींद्र कुलकर्णी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली होती. मात्र, ही भेट निष्फळ ठरल्यामुळे आयोजकांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष होते. राज्य सरकारने या कार्यक्रमाला पूर्णपणे सुरक्षा पुरविण्याची हमी दिली आहे. त्यामुळे या वादाला भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्षाची किनारही प्राप्त झाली आहे.